
संतोष देशमुख हत्याप्रकरणात मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड सध्या तुरुंगात आहे. या वाल्मिक कराडसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. वाल्मिक कराडला तुरुंगात पॅनिक अटॅक आल्याची माहिती आहे.
यानंतर लागलीच हालचाली होऊन त्याची डॉक्टरांनी तपासणी केली. कराड सध्या बीडच्या मध्यवर्ती कारागृहात आहे. सीआयडीकडे त्याच्याविरुद्ध सबळ पुरावे आहेत. त्यामुळे जेलमधील त्याचा मुक्काम आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणखीही काही आरोपी तुरुंगात आहेत. या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली होती.
याबाबत अधिक माहिती अशी, काल दुपारच्या सुमारास वाल्मिक कराडला अस्वस्थ वाटू लागलं. यानंतर त्याची प्रकृती बिघडली होती. या घटनेची माहिती जेल प्रशासनाकडून डॉक्टरांना देण्यात आली. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता त्याला पॅनिक अटॅक आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात आले. डॉक्टरांनी काही रक्त चाचण्या करण्याचा सल्ला दिला आहे. या तपासण्या होऊन त्याचा अहवाल काय येतो, या अहवालात पॅनिक अटॅकचं काय कारण समोर येतं या गोष्टी पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी आहे. कराडनेच संतोष देशमुखांच्या हत्येचा कट रचला असा सीआयडीचा आरोप आहे. या प्रकरणाचा संपूर्ण तपास करून सीआयडीने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले हाते. तसेच वाल्मिक कराड आणि अन्य आरोपींच्या विरोधात पुरावेही दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात सीआयडीकडे कराडच्या विरोधात भक्कम पुरावे आहेत. त्यामुळे कराडच्या अडचणी वाढल्या आहेत.
न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. कराडच्या जामीनासाठी त्याच्या वकिलांनी काही दिवसांपूर्वी अर्ज केला होता. परंतु, त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. त्यामुळे कराड तुरुंगातच आहे. आता त्याच्या विरोधात भक्कम पुरावे सुद्धा आहेत. त्यामुळे तुरुंगातील त्याचा मुक्काम वाढणार आहे. या प्रकरणात वाल्मिक कराड आधी बरेच दिवस फरार होता. त्यानंतर त्याने पुण्यातील सीआयडीला कार्यालयात शरण आला. दरम्यान, या प्रकरणातील आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरारच आहे.