
खासदार लंकेंनी कोणाचं नाव घेतलं !
अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी मोठी प्रतिक्रिया दिली. अहिल्यानगर जिल्ह्याचा विकास कोणी केला, या प्रश्नावर बोलताना, खासदार लंके यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना झुकते माप देताना, भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव न घेता डिवचलं.
खासदार लंके यांनी मंत्री विखे यांचे नाव घेतलं नसलं तरी, त्यांना दुसऱ्या राजकीय ताकदीत नेलं. त्यामुळे खासदार लंकेंच्या या गंभीर आरोपाला मंत्री विखे कोणत्यापद्धतीने प्रत्युत्तर देतात, याकडे आता लक्ष राहणार आहे.
खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) म्हणाले, “विकासाचे दोन प्रकार असतात, लोकांचा विकास करणे, वेगवेगळ्या माध्यमांतून लोकांना मदत करणे, राजकारणात दोन प्रकारांची ताकद असते. माझ्यासारखा लोकप्रतिनिधी मतदारसंघात रस्ते करतो, बंधारे करतो, वेगवेगळे काम करतो, पिण्याचे पाण्याचे प्रश्न सोडवतो, शैक्षणिकमध्ये मदत करतो, आरोग्यात काम करतो, हा एक विकासाचा भाग झाला”. दुसरी राजकीय ताकद अशी असते की, याची कशी जिरवता येईल, याचा धंदा कसा बंद करता येईल, त्याला कसा त्रास देता येईल, असे म्हणत लंकेंनी मंत्री विखे पाटलांचे नाव न घेता डिवचलं.
मला एक प्रकारचा वर्ग माहिती आहे, विकासाला महत्त्व देणारा नेता म्हणजे, ते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat)! असे म्हणत, अहिल्यानगर जिल्ह्याच्या विकासात बाळासाहेब थोरातांचे महत्त्व खासदार लंके यांनी अधोरेखित केले. खासदार लंकेंनी मंत्री विखे पाटील यांचे नाव न घेऊन त्यांना दुसऱ्या वर्गात नेले. एकप्रकारे खासदार लंकेंनी मंत्री विखे पाटलांना डिवचले.
अहिल्यानगर जिल्ह्याचा नेता कोण? विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे आणि स्वतः खासदार नीलेश लंके, यावर बोलताना, खासदार लंके यांनी जिल्ह्याचा नेता कोण हे जनता ठरवेल, असे सांगितले. हीच प्रतिक्रिया काही दिवसांपूर्वी सभापती प्रा. राम शिंदेंनी दिली होती. शिंदे अन् लंकेंची एकच प्रतिक्रिया आल्याने, लोकसभा निवडणुकीवेळी घडलेल्या राजकीय घडामोडींचा इतिहास समोर आला. या निवडणुकीपूर्वी शिंदे-लंके यांची मैत्री चर्चेत आली होती.
महाराष्ट्राचा चांगला मुख्यमंत्री कोण होऊ शकतो? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे की उपमुख्यमंत्री अजित पवार, यावर बोलताना खासदार नीलेश लंके यांनी मी महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करतो. आमचं सरकार असतं, तर पहिलं सांगितलं असतं की, अमूक-अमूक मुख्यमंत्री करा. तुमच्या घरातील लोकांनी कसं राहायचं, हे मी कशाला सांगू. तुम्हाला का म्हणून मार्गदर्शन करायचं. ते सगळी मोठ मोठाली लोकं आहेत. अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिलीत, त्यांनी! माझं जेवढं वय आहे, तेवढं त्यांचं राजकारण झालं आहे. मी उद्या मांडलच, हा मुख्यमंत्री करा, कोण ऐकणार आहे माझं. जिथं ऐकतच नाही कोणी, तिथं सांगायचंच नाही, अशी थेट प्रतिक्रिया दिली.
खासदार लंकेंना उद्धव ठाकरेंचं कौतुक का बरं केलं कौतुक
राज ठाकरे आणि माझा, कधीही संबंध आला नाही. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर माझा बऱ्यापैकी संपर्क आला. उद्धव ठाकरे हे शांतताप्रिय, संयमी, दूरदृष्टी असलेला नेता आहे. कोणाला त्रास होणार नाही, ही त्यांची पहिली भूमिका असते, आणि ते पाळतात देखील. कोविड काळात त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला बाहेर काढलं. देशात सर्वात यशस्वी मुख्यमंत्री म्हणून पाहिलं गेलं. ते संयमी आहेत, असे सांगून उद्धव ठाकरेंनी ‘मी अनुभवलेला कोविड’ या पुस्तकाला शुभ संदेश दिल्याची आठवण खासदार नीलेश लंके यांनी सांगितली.
खासदार लंकेंनी सांगितला राष्ट्रवादीमधील आवडता नेता…
जयंत पाटील की सुप्रिया सुळे, सर्वात कोण आक्रमक आहेत, यावर बोलताना खासदार लंके यांनी कुठल्यावेळी आक्रमक व्हायचं, कोठे संयम बाळगायचा, याची शिकवण पवारसाहेबांनी आम्हा सर्वांना दिली आहे. आक्रमक होताना, त्यात जनतेचं हित पाहतो, संयम देखील तेच सांगतो, दोन्ही नेते पवारसाहेबांच्या कुशीत तयार झालेले आहेत, त्यामुळे ते तेवढ्याच ताकदीचे आहेत, असे सांगितले. लोकसभेतील कामकाजात खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार डाॅ. अमोल कोल्हे या दोघांकडूनही भरपूर मार्गदर्शन मिळतं, आणि आपण देखील शिकत राहतो, असे खासदार लंकेंनी सांगितले.