
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी पिंपरी चिंचवड -बद्रीनारायण घुगे
श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या नवनिर्वाचित विश्वस्तांचा सन्मान सोहळा
आळंदी..मराठी लोकांना त्यांचे स्वतःचे राज्य मिळाले आणि एक मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली म्हणून एक मे रोजी महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने आज श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्यु. कॉलेजच्या ध्वजाचे ध्वजारोहण विद्यालयाचे शिक्षक जयवंत खुंटे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीतातून ध्वजास सर्वांनी मानवंदना दिली.
कार्यक्रमाची सुरुवात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या मूर्तीचे पूजन व दीप प्रज्वलनाने झाली.
त्यानंतर श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या विश्वस्त पदी आळंदी निवासी व श्री ज्ञानेश्वर विद्यालयाचे माजी विद्यार्थी ह.भ.प. चैतन्य महाराज लोंढे (कबीर बुवा), ह.भ.प. पुरुषोत्तमदादा महाराज पाटील यांची तसेच पुणे येथील ॲड. डॉ. रोहिणी पवार यांची निवड झाल्याबद्दल श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या सर्व घटकांच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ, माऊलींची मूर्ती व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्षस्थानी ह.भ.प. बाळासाहेब शेवाळे हे होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये सचिव अजित वडगांवकर यांनी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे नवनिर्वाचित विश्वस्त निलेश कबीर बुवा व पुरुषोत्तम दादा पाटील यांच्या कुटुंबाच्या सांप्रदायिक वारसाची, परंपरेची आणि त्यांच्या समाजातील असलेल्या समाजातील विविध क्षेत्रातील योगदानाची माहिती दिली व हे दोघेही शाळेचे माजी विद्यार्थी असल्या कारणाने त्यांची झालेली ही निवड आमच्या संस्थेच्या सर्व घटकांना भूषणावह व अभिमानाची आहे असे सांगितले.
राज्यभरात नावलौकिक उज्वल करणारी श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था तसेच संस्थेला लाभलेली संत परंपरा अशा संतरुपी व्यक्तिमत्त्वांच्या सहकार्य व आशीर्वादामुळेच प्रगती पथावर कार्यरत असल्याचे सांगितले. यापूर्वी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या वतीने या शिक्षण संस्थेस खूप सहकार्य लाभले आणि आपण नवनिर्वाचित विश्वस्ताकडून यापुढे असेच सहकार्य मिळावे ही अपेक्षा व्यक्त केली. तसेच ॲड. डॉक्टर रोहिणी ताई पवार या मुक्ताईच्या रूपाने देवस्थान वर पहिल्यांदाच एका महिलेची विश्वस्त म्हणून निवड झाल्याने आनंद झाला व त्या निश्चितच महिला वर्गाचे प्रश्न मंदिरात तसेच वारीच्या रस्त्याने सोडवतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली व सर्वांना त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच सालाबाद प्रमाणे संस्थेचे खजिनदार डॉ. दीपक पाटील यांचा पारंपारिक पद्धतीने औक्षण करून अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला. यावेळी अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने संस्था व प्रशालेच्या वतीने शाल, श्रीफळ, माऊलींची मूर्ती व पुष्पगुच्छ देऊन दीपक पाटील यांना निरोगी दीर्घायुष्यासाठी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. शुभेच्छांना उत्तर देताना डॉ. दीपक पाटील यांनी दरवर्षी न विसरता आपण माझा अभिष्टचिंतन सोहळा साजरा करून शुभेच्छा दिल्या यामुळे सर्वांचे आभार व्यक्त केले.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगांवकर, सचिव अजित वडगांवकर, खजिनदार डॉ दीपक पाटील, ज्येष्ठ विश्वस्त लक्ष्मण घुंडरे, मा. उपनगराध्यक्ष नंदकुमार कुऱ्हाडे, मा. उपनगराध्यक्ष विलास घुंडरे, पश्चिम महाराष्ट्र भाजपा अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष संजय घुंडरे, मा. सभापती श्रीधर कुऱ्हाडे, संस्था सदस्य आनंदराव मुंगसे, साहेबराव कुऱ्हाडे, जगदीश भोळे, अनिल वडगांवकर, मा. नगरसेवक नितीन घुंडरे, चरित्र समितीचे धनाजी काळे, विश्वंभर पाटील, विलास वाघमारे, चंद्रकांत गोरे, पत्रकार दादासाहेब कारंडे, अनिल जोगदंड, विद्यालयाचे प्राचार्य सूर्यकांत मुंगसे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, उपप्राचार्य किसन राठोड, पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे, अनिता पडळकर, अनुजायीनी राजहंस, सर्व शिक्षक, पालक, ग्रामस्थ व आदी उपस्थित होते.
या निमित्ताने सुरेश वडगांवकर, दीपक पाटील, सूर्यकांत मुंगसे यांनी आपल्या मनोगतातून संस्थांनच्या विश्वस्तांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या व श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेतून शालेय शिक्षण घेतलेले हजारो कीर्तनकार, प्रवचनकार, समाज प्रबोधनकार इत्यादींचा सन्मान सोहळा या ज्ञान मंदिरात भव्य व दिव्य स्वरूपात साजरा करण्याची संधी आम्हास देवस्थानच्या माध्यमातून मिळावी अशी अपेक्षा सूर्यकांत मुंगसे यांनी देवस्थानच्या नवनिर्वाचित विश्वस्तांकडे व्यक्त केली.
चैतन्य महाराज लोंढे, पुरुषोत्तम महाराज पाटील व रोहिणीताई पवार यांनी देवस्थानच्या विश्वस्त पदी निवड झाल्याबद्दल श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेने केलेल्या सन्मानाबद्दल संस्थेच्या ऋणात कायम राहू असे मत व्यक्त केले. तसेच श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानची सर्व जबाबदारी व कार्य यशस्वीरित्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
यापुढे बोलताना चैतन्य महाराज लोंढे यांनी त्यांची शाळेपासून ते अध्यात्मिक, सांप्रदायिक क्षेत्राचा प्रवास कथन केला व त्यात संस्था व शिक्षकांनी केलेल्या संस्कारामुळे मी या यशाच्या शिखरावर पोहोचल्याची कबुली त्यांनी दिली. श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत चालणाऱ्या “ओळख श्री ज्ञानेश्वरीची” या संस्कारक्षम उपक्रमाचे कौतुक केले. या उपक्रमाच्या माध्यमातून ज्ञानदेवांचे विचार जगातील कानाकोपऱ्यात जाण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच या कार्यासाठी संस्थान या उपक्रमाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून सहकार्य करेल असे आश्वासनही दिले.
संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगांवकर, सचिव अजित वडगांवकर व विश्वस्त यांनी ही संस्था नावा रूपाला आणल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.
शेवटी अध्यक्षीय मनोगतातून ह.भ.प. बाळासाहेब शेवाळे यांनी संस्थानच्या नवनिर्वाचित विश्वस्तांना व अभिष्टचिंतनाच्या निमित्ताने डॉ. दीपक पाटील यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार योगेश मठपती यांनी केले. ह.भ.प. बाळासाहेब शेवाळे यांच्या वाणीतून पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.