
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारतीय सैन्याकडून बदला घेण्यात आला आहे. पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील एकूण 9 दहशतवादी तळांवर भारतीय हवाई दलाने हल्ला करत पाकिस्तानची झोप उडवली आहे.
भारताने यशस्वीरित्या राबविलेल्या या ‘ऑपरेशन सिंदूरनंतर’ सर्वच क्षेत्रातून भारतीय सैन्याचे कौतुक करण्यात येत आहे. पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या हल्ल्यावरून केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी यांचे वाभाडे काढले आहेत. पण त्यांनी सैन्याचे अभिनंदन केले आहे. राज ठाकरेंनंतर त्यांचे बंधू आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनीही त्यांच्या सुरात सूर मिळवला आहे. कारण सैन्याचे अभिनंदन करत उद्धव ठाकरेंनी स्लीपर्स सेलच्या मुद्द्यावरून महत्त्वाचे विधान केले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्घव ठाकरे यांनी भारतीय सेनेच्या शौर्याला सलाम! अशा आशयाच्या खाली भारतीय सैन्याचे कौतुक केले आहे. ठाकरेंनी ऑपरेशन सिंदूरबाबत भावना व्यक्त करत म्हटले आहे की, “भारतीय सैन्याने पाकड्यांच्या दहशतवादी स्थळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद आहे. पहलगाममध्ये 26 मायभगिनींचे कुंकू पुसणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करून सैन्याने बदला घेतला. पाकिस्तानचे भारतातील ‘स्लीपर्स सेल’ उद्ध्वस्त करून दहशतवादाचे समूळ उच्चाटन करणे गरजेचे आहे. भारतीय सैन्य सर्व प्रकारच्या परिस्थितीशी सामना करण्यास सक्षम आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ने ते दाखवून दिले. भारतीय सेनेच्या शौर्याला शिवसेनेचा सलाम ! असे उद्धव ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, उद्धव ठाकरेंनी त्यांचे बंधू, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरात सूर मिळवला आहे. कारण राज ठाकरे यांनी हे एअर स्ट्राइक लोकांची दिशाभूल करण्यासाठी असल्यायचे म्हटले आहे. सरकारने या एअर स्ट्राइकऐवजी भारतातील दहशतवादी कोंबिंग ऑपरेशन करून हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना शोधून काढले पाहिजे होते, असे राज ठाकरेंकडून स्पष्टपणे सांगण्यात आले.
तर, एअर स्ट्राईक करून लोकांचे लक्ष विचलित करणे किंवा युद्ध करणे हा पर्याय नाही. सरकार जिथे चुकते तिथे चुका दाखवायलाच हव्यात, असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे. त्यांच्यानंतर उद्धव ठाकरेंनी सरकारचे नाव न घेता स्लिपर्स सेलविषयीचा मुद्दा मांडला आहे.