
दैनिक चालु वार्ता लोहा प्रतिनिधी-
लोहा शहर हे राष्ट्रीय महामार्गावरील अतिशय महत्त्वाचे शहर असून शहरात गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे.गुटखा बंदी कायदा कागदावरच होत असून जागोजागी खुलेआम विक्री होत आहे.अनेक तरूण गुटख्याच्या आहारी जाऊन व्यसनाधीन होत आहेत.तरूण युवा पिढी जर गुटख्यामुळे कैन्सरसारख्या अनेक दुर्धर आजाराला आमंत्रण देत असेल अन् गुटखा विक्रेते अमाप नफा कमवून मालामाल होत असतील तर शहरातील व परिसरातील तरूण, शालेय विद्यार्थ्यांनी काय आदर्श घ्यावा?असे सुज्ञ नागरिक बोलून दाखवत आहेत.
लोहा शहरातील मुख्य बाजारपेठेसह,मोंढा परिसर, बाजार समिती कमान,गवळी गल्ली परिसर,भाजी मंडईच्या परिसर,शिवकल्याण नगर,सायाळ रोड, गंगाखेड रोड,लोहा शहर परिसरात आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे.पानटपरी, किराणा दुकानदार, हाँटेल,धाबे आदी विक्रीसाठी विविध कंपन्यांच्या गुटखा विक्रीसाठी बिनदिक्कतपणे ठेवले जात आहे.राज्यात गुटखा बंदी असताना गुटखा विक्रेते अन्न व औषध प्रशासन व स्थानिक पोलीस प्रशासनाचे हात ओले करत असल्यामुळे त्यांच्या आशिर्वादाने मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होत आहे. याला वेळीच आवर घालून तरूणाईला वाचविणार कोण?असे खडे सवाल सुज्ञ, जेष्ठ नागरिक विचारत आहेत.या गंभीर बाबींकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे मत अनेक जण व्यक्त करत आहेत.