
इंडिया आघाडी आज सक्रिय नाही. त्यामुळे आम्हाला पुन्हा एकत्र यावे लागेल. आमच्या पक्षाची पुनर्बांधणी करावी लागेल. तरुणांना त्यात सामील करावे लागेल आणि काम करावे लागेल, असं विधान शरद पवार यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत केलं.
राहुल गांधींविषयी काय म्हणाले ?
इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.
राहुल गांधींच्या एकूण नेतृत्वाविषयी काय सांगाल? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, राहुल गांधी कठोर परिश्रम घेतात. जेव्हा देशात समस्या उद्भवतात तेव्हा त्यावर प्रतिक्रिया देतात. पण आज वातावरण राहुल गांधींसाठी काहीतरी मोठं करण्यसाठी असं वातावरणनाही. मी फक्त एवढेच म्हणेन की, त्यांनी तळागाळात आणखी आक्रमकतेने काम करण्याची गरज आहे. फक्त राहुल गांधीच नाही तर सर्व विरोधी पक्षांनी हे करायला हवे.
नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांसारखे मित्र इंडिया आघाडीमध्ये आज असते तर परिस्थिती खूप वेगळी असती, असंही पवार म्हणाले.
एकत्र येण्यासंदर्भात सुप्रिया अन् अजितने ठरवावं…
पुढं ते म्हणाले, आपल्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन मतप्रवाह आहेत. एका गटाला वाटतं की आम्ही एकत्र यावं, अजित पवारांसोबत जावं असं वाटतं. तर दुसऱ्या गटाला वाटतं की, अजितदादांसोबत जाऊ नये, असं पवार म्हणाले. इतकंच नाही तर संसदेमध्ये सत्ताधारी पक्षासोबत बसायचं की, विरोधी पक्षासोबत बसायचं यांचा निर्णय सुप्रिया सुळेंनी घ्यावा, असं सूचक वक्तव्यही पवारांनी केलं. एकत्र येण्यासंदर्भात सुप्रिया आणि अजित यांनी बसून ठरवावं, असंही पवार म्हणाले.
…तर मला आश्चर्य वाटणार नाही
पक्ष उभा करताना आज बाजूला गेलेले सगळे एकत्र होते, त्यांच्या सगळ्यांची विचारधारा एकच आहे, त्यामुळे भविष्यात जर हे सगळे एकत्र आले तर मला आश्चर्य वाटणार नाही, असंही शरद पवार म्हणाले.