
दैनिक चालु वार्ता पालघर प्रतिनीधी -रवि राठोड
ठाणे (भिवंडी) भिवंडी तालुक्यातील पिलंझे गावात केवळ एक लाख वीस हजार रुपयांच्या मोबदल्यात एका अल्पवयीन कातकरी मुलीचा विवाह लावून देण्याचा गंभीर प्रयत्न उघडकीस आला असून, या प्रकाराने मानवी विक्रीसारखी गंभीर मानवताविरोधी कृती उजेडात आली आहे. श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे हा सौदा थांबवण्यात यश आले. या प्रकरणी गणेशपुरी पोलीस ठाण्यात ११ जणांविरोधात बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार तसेच मानवी अपव्यापाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रमजीवी संघटनेचे संस्थापक तथा राज्यस्तरीय आढावा समितीचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) विवेक पंडित यांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे. कुणाचा कितीही दबाव आला तरी त्या दबावाला बळी न पडता याबाबत कायदेशीर कारवाई करा व जे कोणी यामध्ये सहभागी असतील त्यांना आरोपी करा अशा सूचना पंडित यांनी पोलिसांना दिल्या आहेत. असे प्रकार रोखण्याचे ज्यांचे कर्तव्य आहे ते ग्रामविकास अधिकारी, पोलीस पाटील इत्यादी शासनाचे ग्राम पातळीवरील कर्मचारी कर्तव्य पार पाडीत नसल्याचे सांगत पंडीत यांनी नाराजी व्यक्त केली.
सदरील प्रकरणात, कातकरी समाजातील आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीचा १ लाख २० हजार रुपयांत सौदा करण्यात आला होता. विवाहाच्या नावाखाली हा प्रकार वास्तवात मुलीची विक्रीच असल्याचे स्पष्ट होते. लग्नाचे वऱ्हाड हा विवाह पार पडून नवर देवाच्या गावाकडे परत निघाले असल्याची माहिती, श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते दयानंद पाटील यांना मिळताच . त्यांनी तातडीने हस्तक्षेप करत वऱ्हाडाची गाडी थांबवली आणि संपूर्ण प्रकाराची माहिती संघटनेचे संस्थापक तथा आदिवासी आढाव क्षेत्र अध्यक्ष (मंत्री दर्जा ) विवेक पंडित यांना दिली, दरम्यान याबाबत गणेशपुरी पोलिसांना कळवल्यानंतर
गणेशपुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिपान सोनवणे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन नवरा मुलगा, मुलीच्या वडिलांसह वऱ्हाडातील इतर सदस्य आणि दलाल अशा एकूण ११ जणांना ताब्यात घेतले. सर्वांविरोधात बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याना अटक करण्यात आली आहे.
ही घटना समाजात सुरू असलेल्या मुलींच्या सौद्यांच्या, बळजबरीच्या आणि कायदेशीर वयापूर्वी लावल्या जाणाऱ्या लग्नांच्या प्रकारांची गंभीरता दर्शवते . श्रमजीवी संघटना आणि पोलिस प्रशासनाच्या वेळीच झालेल्या कृतीमुळे या अल्पवयीन मुलीचे भवितव्य उध्वस्त होण्यापासून वाचले आहे. यापूर्वीही असे अनेक प्रकार घडले असून त्यांची चौकशी करावी अशी मागणी श्रमजीवी संघटनेने केली आहे.