
आमदारांना म्हणाले; ‘शरद पवारांच्या…
सुप्रीम कोर्टाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यात पार पडतील असं स्पष्ट झालं आहे. पुढील काही महिने हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या धामधुमीचे असतील.
याच पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या हलचाली सुरु झालेल्या असतानाच पुन्हा एकदा बहुचर्चित काका- पुतण्याची जोडी पुन्हा एकत्र येणार असल्याचं म्हटलं जात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चा सुरु असलेला विषय म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं पुन्हा मनोमिलन होऊन काका-पुतण्या एकत्र येणार का? राजकीय तज्ज्ञांपासून पक्ष कार्यकर्त्यांमध्येही या विषयावर चर्चा रंगलेली असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विषयावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया नोंदवली आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या संभाव्य विलिनिकरणासंदर्भात अजित पवारांनी पक्षाच्या आमदारांच्या बैठकीमध्ये विधान केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शरद पवार नेमकं काय म्हणालेले ?
एका मुलाखतीदरम्यानच्या अनौपचारिक गप्पांदरम्यान दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यायचं की नाही याचा निर्णय पुढच्या पिढीने घ्यावा, मी त्या निर्णय प्रक्रियेत नाही असं पवार म्हणाले होते. तेव्हापासूनच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा रंगू लागली आहे. अगदी अजित पवार सुप्रिया सुळे एकत्र येण्याचा निर्णय घेण्यापासून दोन्ही बाजूकडील दुसऱ्या फळीतील नेत्यांनी घेतलेली वेट अॅण्ड वॉचची भूमिका अशा बऱ्याच बातम्या समोर आल्यानंतर शरद पवार यांनी केलेल्या विधानावर पहिल्यांदाच अजित पवार बोलल्याचं पाहायला मिळालं आहे.
अजित पवार पक्षाच्या आमदारांना काय म्हणाले?
मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गळती लागण्याची शक्यता असल्याने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात चर्चा केली जात असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे. आगामी काळातील पक्षातील गळती थांबवण्याच्या अनुषंगाने शरद पवारांकडून वक्तव्य आली असतील अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे.
…म्हणूनच शरद पवारांकडून पक्ष एकत्रीकरणाबाबतचे सुतोवाच
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून पक्षाला राम राम करण्याची हालचाल सुरू असेल म्हणूनच शरद पवारांकडून पक्ष एकत्रीकरणाबाबतचे सुतोवाच केले असतील,’ असं अजित पवार आमदारांच्या बैठकीमध्ये म्हटलं आहे.
वरिष्ठ पातळीवर कोणतीही चर्चा नाही
मंत्री दत्ता भरणे यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत अजित पवारांनी आमदारांना मार्गदर्शन करताना हे विधान केलं आहे. सध्या दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत वरिष्ठ पातळीवर कोणतीही चर्चा नाही, असंही अजित पवारांनी आमदारांना स्पष्टपणे सांगितलं आहे.