
लाडक्या बहिणीच्या नावाखाली सरकारने ईव्हीएम घोटाळा लपवला !
लाडकी बहीण योजनेचे बुजगावणे उभे करून सरकारने ईव्हीएम घोटाळा लपवला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. लाडक्या बहिणींनी सरकारला मते दिली.
पण, सरकारने लाडकी बहीण योजनेचे बुजगावणे उभे करून ईव्हीएम घोटाळा लपवला आहे, असा खळबळजनक आरोप माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला.
बच्चू कडू आज कऱ्हाड दौऱ्यावर आले होते. त्यावेळी कराडच्या विश्रामगृहात माध्यमांशी बोलताना त्यांनी हा खळबळजनक आरोप केला आहे. तसेच, कर्जमाफी कशी करता येऊ शकते, हे आपण अजितदादांना बारामतीत जाऊन सांगणार असल्याचे चॅलेंज प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भारतीय जनता पक्षाने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. मात्र राज्याची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे अजित पवारांनी दोन वर्षे तरी कर्जमाफी देता येणार नाही, असे सांगितले आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम ३५ हजार कोटी रुपये आहे, त्यामुळे कर्जमाफी कशी देता येऊ शकते, हे आम्ही दोन जून रोजी बारामतीत जाऊन अजितदादांना सांगणार आहोत, असे चॅलेंज प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले आहे.
भाजपने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, वीस टक्के बोनस अनुदान देण्याची घोषण निवडणुकीच्या काळात केली होती. राज्याचा अर्थसंकल्प हा सात लाख कोटी रुपयांचा आहे, मात्र त्यातील केवळ नऊ हजार कोटी रुपये कृषी विभागासाठी ठेवले आहेत. केंद्र सरकारनेही तसाच अन्याय कृषी क्षेत्रावर केला आहे. केंद्राचे सुमारे ५० लाख कोटींचे बजेट होते. मात्र, बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी केवळ एक लाख कोटींची तरतूद आहे, असे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.
कडू म्हणाले, कच्चा तेल्याचे भाव सात वर्षांत ४० टक्क्यांनी घसरले आहेत. पण मोदी सरकारने सात वर्षांत लिटरमागे १५ रुपये वाढवून त्या सात कंपन्यांना सात लाख कोटींचा नफा मिळवून दिला आहे. त्या रक्कमेवर केंद्र सरकारला ४० लाख कोटी रुपये मिळाले आहेत. सर्वसामान्यांच्या खिशातून केंद्र सरकारने राज्याच्या बजेटएवढे पैसे काढले आहेत. सर्वसामान्यांना लुटण्याचे काम सरकारकडून सुरू आहे.
पीकविमा योजनेतील तीन तरतुदी रद्द करुन एकच तरतूद ठेवली आहे. पीक कापणीच्या प्रयोगावर जेवढे नुकसान दिसेल, तेवढीच भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे. पीकविमा योजनेत २०२४ मध्ये शेतकऱ्यांनी चार हजार ७१ रुपये भरले, तर सरकारने त्या कंपन्यांना भरपाईपोटी ३२ हजार ५५० रुपये भरले आहेत. मात्र शेतकऱ्यांना तेवढी भरपाईची रक्कम मिळाली नाही.
आपलेच नेते आपल्याला लुटत आहेत : बच्चू कडू
ते म्हणाले, अर्थमंत्री अजित पवार यांना बारामतीत जाऊन कर्जमाफी कशी करायची, हे सांगणार आहे. राज्याच्या एकूण अर्थसंकल्पाच्या तुलनेत कर्जमाफीची ३५ हजार कोटींची रक्कम जास्त नाही. जनतेला पक्ष आणि जातीपातीमध्ये अडकवून ठेवले आहे. आपलेच नेते आपल्याला लुटत आहेत, तरीही आपण त्यांना मते देतो, हे चुकीचे आहे.