
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी परिसरातील बजाजनगर येथील उद्योजक संतोष राधाकिशन लड्डा यांच्या निवासस्थानी मोठा दरोडा पडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
दरोडेखोरांनी तब्बल 8 किलो सोनं आणि 40 किलो चांदी, असा कोट्यवधींचा ऐवज लंपास केला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संतोष लड्डा यांचा मुलगा अमेरिकेत शिक्षणासाठी आहे. त्याला भेटण्यासाठी लड्डा कुटुंब आठ दिवसांपूर्वी परदेशात गेले होते. लड्डा कुटुंब विदेशात असल्याचा फायदा घेत सहा दरोडेखोरांनी हे कृत्य केल्याची माहिती समोर येत आहे.
8 किलो सोनं आणि 40 किलो चांदी लंपास
दरोडेखोरांनी घरात असलेल्या ड्रायव्हर आणि केअरटेकरच्या हातपाय बांधून त्याला बंदुकीचा धाक दाखवून दरोडा टाकला. केअरटेकरच्या डोक्यावर बंदूक ठेवत धमकी देत त्यांनी संपूर्ण घराची झडती घेतली आणि मौल्यवान दागिने व चांदी चोरून नेले. प्राथमिक माहितीनुसार, सुमारे 8 किलो सोने आणि 40 किलो चांदी दरोडेखोरांनी लंपास केल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं पथक, डॉग स्क्वॉड आणि फिंगरप्रिंट तज्ञ घटनास्थळी दाखल झाले आहेत. सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागलं असून त्यावरून आरोपींचा माग काढण्याचे काम सुरु आहे. या घटनेमुळे वाळूज परिसरातील उद्योजकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे वेगात फिरवली आहेत. सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दरोडेखोरांचा शोध सुरू आहे.
अंतापूर शिवारातील शेतवस्तीवर दरोडा, 3 तोळे सोने लंपास
दरम्यान, ,वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अंतापूर शिवारातील एका शेतवस्तीवर रविवारी (दि. 11) मध्यरात्री सहा दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवत थरार माजवला. तलवार, कोयते आणि सुऱ्यांनी सज्ज असलेल्या या टोळीने घरात घुसून महिलांच्या कानातील दागिने जबरदस्तीने ओरबाडले. या हल्ल्यात 3 तोळे 2 ग्रॅम सोने व सुमारे 1 लाख 18 हजारांचा ऐवज चोरून नेण्यात आला. हा थरार शेतकरी योगेश रामराव इंगळे यांच्या शेतातील घरात घडला. रात्री साधारण 12 वाजण्याच्या सुमारास सहा चोरटे घरात घुसले. चोरट्यांनी चेहऱ्यावर रूमाल बांधून कडी-कोयंडा तोडत घरात प्रवेश केला आणि घरातील सदस्यांना शस्त्रांचा धाक दाखवत एका खोलीत बंद केलं.
तब्बल एक तास हा थरार सुरु होता. चोरट्यांनी महिलांच्या कानातील कुंडे कैचीने कापून, टॉप्स आणि इतर सोन्याचे दागिने हिसकावून घेतले. बेडरूममधील कपाटे उघडून त्यांनी एकूण 1 लाख 18 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करत श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण केले. घटनास्थळी महत्त्वाचे ठसे आणि पुरावे गोळा करण्यात आले आहेत.या प्रकरणी योगेश इंगळे यांच्या तक्रारीवरून सहा अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करत श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण केले. घटनास्थळी महत्त्वाचे ठसे आणि पुरावे गोळा करण्यात आले आहेत.या प्रकरणी योगेश इंगळे यांच्या तक्रारीवरून सहा अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.