
प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंसोबतच्या ‘गुप्त भेटीने’ राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण !
राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी एक अनपेक्षित भेट आज मुंबईत झाली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ज्येष्ठ नेते उर्फ नाथाभाऊ यांनी थेट भाजप प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली.
एकनाथ खडसे आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
या भेटीचा विषय अधिकृतरित्या ‘राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाबाबत बैठक आयोजित करण्यासाठी’ असल्याचे सांगितले जात असले तरी, राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर या ‘गुप्त भेटीला’ वेगळेच राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास पंधरा मिनिटे बंद दाराआड चर्चा झाली. नेमके काय शिजले याची उत्सुकता राजकीय वर्तुळात चांगलीच वाढली आहे.
नाथाभाऊंची पुन्हा भाजपकडे वाटचाल?
Eknath Khadse यांनी तीन वर्षांपूर्वी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र, राज्यात दोन गटात विभागलेली राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार की नवा राजकीय ‘स्फोट’ होणार, याची चर्चा तापली आहे. अलीकडेच जळगाव जिल्ह्यातून गुलाबराव देवकर आणि डॉ. सतिश पाटील यांनी शरद पवार यांना सोडून अजित पवार गटात प्रवेश केला आहे. याच पार्श्वभूमीवर नाथाभाऊंची ही भेट विशेष चर्चेचा विषय ठरली आहे. काही दिवसांपूर्वी ‘नाथाभाऊंची घरवापसी’ जवळपास निश्चित असल्याच्या चर्चा होत्या. मात्र स्थानिक भाजप नेत्यांच्या विरोधामुळे या चर्चांना ब्रेक लागला होता.
नाथाभाऊंनी सस्पेन्स वाढवला!
यासंदर्भात बोलताना एकनाथ खडसे यांनी, “मी अजूनही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत आहे, आणि कुठेही जाण्याचा विचार नाही,” असे ठाम सांगितले आहे. मात्र, त्यांच्या या ‘बंद दारामागील’ भेटींनी राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले असून, आगामी काही दिवसांत आणखी काही राजकीय घडामोडी घडतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.