
आता तुर्कीच्या राष्ट्रपतींची प्रतिक्रिया; म्हणाले पाकिस्तानला आम्ही मदत…
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने जोरदार कारवाई करत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये (POK) ऑपरेशन सिंदूर राबवले.
भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून 7 मे रोजी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताने पाकिस्तानचा प्रत्येक डाव हाणून पाडला. या सर्व घडामोडींमध्ये तुर्कीने भारतासोबत झालेल्या तणावात पाकिस्तानला जाहीरपणे पाठिंबा दिला होता. भारताविरुद्धच्या युद्धात पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा देणाऱ्या तुर्कीने पुन्हा एकदा दहशतवादाला आश्रय देणाऱ्याला पाठिंबा दिला आहे. तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगन यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या नुकसानीचा विचार न करता तुर्की पाकिस्तानला मदत करतच राहणार असल्याचे म्हणत पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगन यांनी याआधी ट्विट करत स्पष्टपणे म्हटले होते की, “चांगल्या आणि वाईट काळात आम्ही नेहमीच पाकिस्तानसोबत उभं राहू.” त्यानंतर आता पुन्हा एकदा एर्दोगन यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या संभाव्य नुकसानीकडे दुर्लक्ष करत, तुर्की पाकिस्तानला मदत करतच राहील, असं म्हटलं आहे. याआधी केलेल्या एका ट्विटमध्येही त्यांनी म्हटले होते की, “पाकिस्तानमधील आमच्या बंधुभावांच्या लोकांसोबत आम्ही सदैव उभे राहू.” द्वेष किंवा राजकीय तोल सांभाळण्याऐवजी तुर्कस्तानकडून आता पाकिस्तानला छुप्या मदतीऐवजी उघड पाठिंबा दिला जात आहे. या पाठिंब्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी प्रतिक्रिया देत तुर्कस्तानचे आभार मानले आहेत.
तुर्कीची छुपी मनोवृत्ती
दरम्यान, ज्या प्रकारे तुर्कीने भारतासोबत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानची बाजू घेतली, त्यानंतर सतत हा प्रश्न उपस्थित केला जात आहे की, मुस्लिमबहुल असलेल्या तुर्किएनेच अशा प्रकारे पाकिस्तानला पाठिंबा का दिला? कारण, इराणपासून ते अनेक मुस्लिम देशांनी तुर्कीसारखं पाऊल उचललेलं नाही. स्वतःला पाकिस्तानचा सदैवचा मित्र म्हणून मांडणाऱ्या तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगन यांनी ज्या प्रकारे उघडपणे पाकिस्तानची बाजू घेतली आहे, त्यामागे त्यांची एक मोठी आणि शिताफीने आखलेली मनोवृत्ती लपलेली आहे. तुर्की सध्या संरक्षण क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत असून, जागतिक स्तरावर स्वतःचा प्रभावशाली ठसा उमठवण्याचा प्रयत्न करत आहे. तो आता जगातील अकरावा सर्वात मोठा संरक्षण सामग्री निर्यात करणारा देश बनला आहे. एका अहवालानुसार, 2014 ते 2018 या कालावधीच्या तुलनेत 2019 ते 2023 दरम्यान तुर्कीचा शस्त्रास्त्र निर्यातीत दुपटीने वाढ झाली आहे. म्हणजेच 2019 ते 2023 या कालावधीत तुर्किएच्या संरक्षण निर्यातीत सुमारे 106 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
तुर्कीचा संरक्षण क्षेत्रात विस्तार करण्याचा प्रयत्न
संरक्षण निर्यातीबाबत बोलायचे झाल्यास, तुर्कीच्या पुढे असलेले 10 देश म्हणजेच फ्रान्स, अमेरिका, रशिया, इटली, दक्षिण कोरिया, चीन, जर्मनी, स्पेन, इस्त्रायल आणि ब्रिटन. अशा परिस्थितीत तुर्कीचे पाकिस्तानला मदत करणे हे केवळ एक रणनीतिक पाऊल नाही, तर त्यामागे आणखी एक मोठा उद्देश आहे. एकीकडे तुर्की पाकिस्तानला मदत करून आपली मैत्री अधिक घट्ट करत आहे, तर दुसरीकडे आपला संरक्षण बाजारही विस्तारत आहे. तुर्कीने सर्वाधिक शस्त्रास्त्र संयुक्त अरब अमिरातला विकले आहेत, त्यानंतर कतारला, आणि मग पाकिस्तानला. त्यामुळे तुर्कीने पाकिस्तानला शस्त्रास्त्र देण्यामागचा खरा उद्देश फक्त मदत नव्हे, तर स्वतःचा संरक्षण क्षेत्राचा व्यापार वाढवणे हा देखील आहे.