
मोदी सरकारचे कौतुक करण्याबाबत काँग्रेस नेत्याचे विधान चर्चेत…
काँग्रेसचे जेष्ठ नेते उदित राज यांनी त्यांचे सहकारी शशी थरूर यांनी पनामा येथे नरेंद्र मोदी सरकारची ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर कौतुक केल्याने टीका केली आहे.
यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे बुधवारी पाहायला मिळाले. तिरुअनंतपुरमचे खासदार असलेल्या थरूर यांनी भारताच्या सर्व पक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करत असताना पनामा येथे पाकिस्तानात केलेल्या कारवाईच्या मुद्यावरून केंद्र सरकारची स्तुती केली होती.
उदय राज यांनी थरूर यांना ‘सुपर प्रवक्ता’ म्हटले आहे. तसेच दावा केला आहे की थरूर हे भाजपाच्या कोणत्याही इतर सदस्यांपेक्षा पंतप्रधान मोदी यांचे कौतुक करण्याचे काम अधिक चांगल्या पद्धतीने करत आहेत. तसेच त्यांनी केंद्र सरकार लष्कराच्या कारवाईचे विनाकारण श्रेय घेत असल्याचा मुद्दा देखील त्यांनी यावेळी मांडला.
शशी थरूर हे भाजपाचे सुपर प्रवक्ते आहेत. जे भाजपाच्या लोकांना जेवढं बोलता येत नाहीये , मोदींची चमचेगिरी, त्यांचे गुणगान करता येत नाही, तेवढं शशी थरूर करत आहेत, असे राज हे एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले.
काँग्रेसचे खासदार शशी थरूर य़ांनी पनामा येथे केलेल्या विधानावर राज हे प्रतिक्रिया देत होत. थरूर पनामा येथे बोलताना म्हणाले होते की, भारताची दहशतवादाकडे पाहण्याची भूमिका बदलली आहे आणि आता दहशतवाद्यांना माहिती आहे की त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
“यापूर्वीची सरकारे ही आत्ताच्या सरकारप्रमाणे नव्हती. हे सरकार काही करणार नाही पण तरीही त्याचे श्रेय घेईल,” असेही राज एएनआयशी बोलताना म्हणाले.
थरूर काय म्हणाले होते?
२०१६ साली करण्यात आलेली सर्जिकल स्ट्राईक आणि २०१९ साली बालाकोट स्ट्राईक बद्दल कौतुक करताना थरूर म्हणाले होते की, “गेल्या काही दिवसात जे काही बदलले आहे ते म्हणजे दहशतवाद्यांना जाणीव झाली आहे की त्यांना किंमत मोजावी लागेल, यात शंका नाही. सप्टेंबर २०१६ मध्ये उरी स्ट्राईक दरम्यान भारताने दहशतवादी तळावर, लाँच पॅडवर सर्जिकल स्टाईक करण्यासाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील नियंत्रण रेषा ओलांडली.
थरूर यांनी स्पष्ट केले की, भारताने करागिर युद्धादरम्यान एलओसी ओलांडली नाही, पुढे ते म्हणाले की २०१९ मध्ये पुलवामा हल्ल्यात झालेल्या भारतीय जवानांच्या मृत्युचा बदला घेण्यासाठी भारताने केवळ नियंत्रण रेषाच नव्हे तर आंतरराष्ट्रीय सीमा देखील ओलांडून एक पाऊल पुढे टाकले.
थरूर यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षांचे शिष्टमंडळ हे तीन दिवसांच्या पनामा दौऱ्यावर आहे. या शिष्टमंडळात इतर खासदार देखील आहेत ज्यामध्ये सर्फराज अहमद, जी एम हरिष बालयोगी, शशांक मनी त्रिपाठी, तेजस्वी सूर्या, भूवनेश्वर कलिता, मल्लिकार्जुन देवरा, मिलिंद देवरा आणि भारताचे अमेरिकेतील राजदूत तरणजीत सिंग संधू यांचा समावेश आहे.