
महसूलमंत्री ॲक्शन मोडवर; पुणे भूमी अभिलेख विभागात समुपदेशाने बदल्या…
पुणे : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे हवेली व पुणे जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयाबाबत ॲक्शन मोडवर आल्याने त्यांची मात्रा पुणे विभागालाही लागू पडली आहे. महसूल मंत्र्यांच्या धसक्याने भूमी अभिलेख पुणे विभागात बदल्यांच्या रुपाने स्चच्छतेचे पहिले परफेक्ट पाऊल पडले आहे.
भूमी अभिलेख पुणे विभागातील बदल्या समुपदेशनाने नुकत्याच समाधानकारक पार पडल्या आहेत. यामध्ये हवेलीतील बदलीस पात्र असलेल्या भूकरमापकांना थेट पुणे जिल्ह्यांबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
तसेच खाबूगिरीला चाप लावत, लक्षमूल्य आकडेमोडीच्या बाजाराविना या बदल्या पार पडल्याने नागरिकांनी व भूमी अभिलेख विभागातील कर्मचा-यांनीही समाधान व्यक्त केले आहे.हवेली व पुणे जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयातील कारभाराचे राज्यभर वाभाडे निघाले होते. हे चित्र स्वच्छ करण्यासाठी महसूलमंत्र्यांनी कबंर कसली असून त्यांनी वरिष्ठ अधिका-यांची खरडपट्टी करत कारभारात बदल करण्यासाठी कडक शब्दांत समज दिलेली होती. त्यामुळे वरिष्ठ अधिका-यांची पावले योग्य दिशेला पारदर्शकतेने पडू लागल्याचे बोलले जात आहे.
भूमी अभिलेख पुणे प्रदेशचे उपसंचालक राजेंद्र गोळे यांनी कर्मचा-यांच्या बदलीचा आदेश नुकताच जारी केला आहे. बदली आदेशात बदल करून घेण्यासाठी कोणात्याही कर्मचाऱ्याने प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास संबधित कर्मचाऱी शिस्तभंग कारवाई करण्यास पात्र असल्याचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. बदली झालेल्या कर्मचा-यांना कार्यालयीन प्रमुखांनी तात्काळ कार्यमुक्त करावयाचे आहे. तसेच पदस्थापना केलेल्या कार्यालयात त्वरीत रुजू होण्याचे आदेश राजेंद्र गोळे यांनी दिले आहेत.
दरम्यान, हवेली भूमी अभिलेख कार्यालयातील बदलीस पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांना थेट पुणे जिल्ह्यांबाहेरची हद्द दाखवली आहे. हवेली व पुणे जिल्हा भूमी अभिलेख अधिक्षक कार्यालयातील कारभार स्वच्छ करण्यासाठी थेट मंत्रालयातून सूचना असल्याने प्रशासनाने बदली प्रक्रियेत कमालीची खबरदारी घेतली होती. बदल्यांमधील खाबूगिरीला चाप लावण्यास प्रशासन यशस्वी ठरले आहे. त्यामुळे
मोजणी कार्यालयातील ‘कारभार’ आता तरी सुधारणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.