
प्रताप सरनाईकांचा राजीनामा घ्या; भाजप आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र !
मुंबई: मिरा भाईंदरमध्ये भाजप आमदार नरेंद्र मेहता आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित थेट प्रताप सरनाईक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
भाजप आणि शिवसेना जिल्हाप्रमुखांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे लेखी मागणी मात्र ही चौकशी पारदर्शकरित्या व्हावी यासाठी सरनाईक यांचा राजीनामा घ्यावा..अन्यथा काही अधिकारी दडपनाखाली काम करतील अस मेहता यांनी पत्रात म्हटले आहे.
काय आहे मेहता यांचे पत्र?
महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री मा.ना. श्री. प्रताप सरनाईक यांनी आपणास दि. 27 मे 2025 रोजी पत्र दिले असुन त्या पत्रामध्ये त्यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्री. दिलीप जैन व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख श्री. राजु भोईर यांनी केलेल्या आरोपाची चौकशी करणेबाबत मागणी केली आहे. सदर मागणी ही योग्य असुन सदर मागणीच्या अनुषंगाने हि चौकशी होणे गरजेचे आहे. जेणेकरून जनतेमध्ये आपल्या शासनाबद्दल होत असलेला गैरसमज दूर होण्यास मदत होईल.
तसेच सदरचा पत्र व्यवहार हा केवळ राजकीय नसुन प्रत्यक्षात चौकशी करणेबाबतचा आहे हे सुद्धा जनते पर्यंत सांगण्यास मदत होईल.
परंतु, यामध्ये सद्यस्थितीतप्रताप सरनाईक साहेब हे कॅबिनेट मंत्री असल्यामुळे जर चौकशी करायची झाल्यास ही चौकशी पारदर्शिकरित्या होऊ शकत नाही. काही अधिकारी दडपणाखाली किंवा प्रभावाखाली काम करण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरता सर्वप्रथम आपण श् प्रताप सरनाईक यांचा राजीनामा घेऊन सदर चौकशी करावी. जेणे करून हि चौकशी पारदर्शक होईल नाहीतर हे आरोप प्रत्यारोप केवळ खानापुर्तीसाठी चालु आहे असा संदेश जनतेमध्ये जाईल, असे या पत्रामध्ये म्हटले आहे.
दरम्यान, प्रताप सरनाईक यांनी स्वतःच्या राजकीय व व्यवसायिक फायद्यासाठी महानगरपालिका व राज्य सरकारचे नुकसान केले आहे. चेना काजूपाडा येथे स्वतःची वैयक्तिक मालकी जमीन खरेदी करून त्या जमिनीचा विकास करण्यासाठी सरकारचे व महानगर पालिकेचे सुमारे 150 कोटी खर्च करून त्या जमिनी जवळ पोहचण्यासाठी रस्ते व गटारे बांधण्यात आले आहे,असे गंभीर आरोप मिरा भाईंदर भाजप जिल्हा अध्यक्ष दिलीप जैन यांनी केले होते. जैन यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्याकडे लेखी तक्रारही दिली होती.