11 जणांच्या मृत्यूमुळे गौतम गंभीर RCB वर संतापला; म्हणाला ‘तुम्हाला बंद दरवाजाच्या आत…
आरसीबीच्या आयपीएल 2025 हंगामताील विजयी सेलिब्रेशनमुळे 11 जणांना जीव गमवावा लागल्यानंतर सर्व स्तरातून टीका होत आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरनेही परखड मत मांडलं असून, आरसीबीने विजयी परेड काढायलाच नको होती असं म्हटलं आहे. असे कार्यक्रम बंद दरवाजाआड व्हायला हवेत असंही मत त्याने मांडलं आहे.
18 वर्षांनंतर पहिल्यांदाच आयपीएल जिंकल्याचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा आनंद काही क्षणातच दुःखात रुपांतरित झाला. चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळाडूंचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र मैदानाबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सायंकाळी 5 वाजता विधान सौधात विराट कोहली आणि रजत पाटीदार यांच्यासह आरसीबी संघातील सदस्यांचा सत्कार केला आणि त्यानंतर नियोजित बस परेड झाली. जिथे हा कार्यक्रम होणार होता त्या परिसरात लाखो लोक जमले होते. या कार्यक्रमात 11 जणांचा मृत्यू झाला आणि जवळपास 50 जण जखमी झाले.
भारतीय संघ कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार असून, त्याआधी गौतम गंभीरने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याला बंगळुरुतील दुर्घटनेबद्दल विचारलं असता म्हणाला की, “आपल्याला रोड शोची गरज आहे, असं मला कधीच वाटत नव्हते. मी जेव्हा खेळत होतो तेव्हाही माझं हेच मत होतं. 2007 चा टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतरही आपण रोड शो करू नयेत असं माझं म्हणणं होतं. लोकांचं जीवन खूप महत्वाचं आहे आणि मी तेच म्हणत राहीन. भविष्यात आपण अशा प्रकारचे रोड शो न करण्याबद्दल थोडेसे जागरूक राहू शकतो आणि कदाचित ते बंद दरवाजाआड करू शकतो. जे घडले ते खूप दुःखद आहे. ज्या कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्या प्रति मला वाईट वाटत आहे”.
“भविष्यात असं काही होऊ नये अशी आशा आहे. कारण आपण सर्वजण जबाबदार नागरिक आहोत. आपण सर्वांनी याची काळजी घ्यायला हवी. जर आपण रोड शोसाठी तयार नसू, तर तो करु नये. तुम्ही 11 लोकांना गमावू शकत नाही, असंही तो म्हणाला.
भारताचे दिग्गज क्रिकेटर कपिल देव यांनीही यावर भाष्य केलं आहे. मला खूप वाईट वाटत आहे. मला वाटतं आपण एकमेकांकडून शिकलं पाहिजे. पुढच्या वेळी असं काहीतरी (विजय परेड) घडेल तेव्हा लोकांनी अधिक जागरूक राहायला हवं. लोक चुका करतात, असं कपिल देव यांनी आर्चे ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेडने आयोजित केलेल्या कॉर्पोरेट कार्यक्रमादरम्यान पीटीआयला सांगितलं.
1983 च्या विश्वचषक विजेत्या भारतीय कर्णधाराने संघांना आणि इतर भागधारकांना अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजित करताना संयम राखण्याचं आवाहन केलं. चूक इतकी मोठी नसावी की तुम्ही मजा करत असता आणि जीव गमवावा लागतो. भविष्यात, जर कोणताही संघ जिंकला तर संयम राखा. आनंद साजरा करण्यापेक्षा जीव जास्त महत्त्वाचे आहेत, असं ते पुढे म्हणाले.


