कुणाला होणार जास्त फायदा ?
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार हे अखेर शिक्कामोर्तब झाले आहे, ही बाब संदीप देशपांडेंच्या एका पोस्टमुळे आता अधिकच स्पष्ट झाली.
पहिल्यांदाच राज आणि उद्धव ठाकरेंचे एकत्रित आवाहन असलेली पोस्ट देशपांडेंनी शेअर केली. त्यामुळे आगामी काळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे पक्षीय पातळीवर एकत्र येऊ शकतात, जर ही गोष्ट ठरली तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही दोघे एकत्र लढवण्याची दाट शक्यता आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेला दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. युबीटी शिवसेना नेते संजय राऊत आणि मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या पोस्ट आणि वक्तव्य सध्या जास्त चर्चेत आहे. अशातच दोन्ही पक्षांकडून हिंदीविरोधात आवाज उठवला जात आहे.
शालेय अभ्यासक्रमात पहिलीपासून हिंदी नको अशी दोघांचीही भुमिका आहे, ती भुमिका आजची नाही ही वारशानुसार आलेली भुमिका आहे. बाळासाहेब ठाकरेंनीही मराठी अस्मितेला जास्त महत्व दिले. महाराष्ट्र राज्य निर्मितीवेळीही शिवसेना म्हणून मोठे योगदान होते.त्यामुळे एकाच विचारधारेचे आणि वारशांचे दोन पक्ष एकत्र येत आहेत, यासंदर्भात अनेक महत्वाची विधानेही आली आहेत.
महाराष्ट्रातील शाळांमध्ये पाचवीपर्यंत हिंदी हा तिसरा विषय म्हणून शिकवण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाविरुद्ध शिवसेना (यूबीटी) आणि मनसे एकत्र आले आहेत आणि या निर्णयाचा निषेध करत आहेत.दोन्ही पक्षांनी याला मराठी भाषेवर हिंदी लादण्याचा प्रयत्न म्हणत सरकारवर जोरदार हल्ला चढवला. दरम्यान, राज्य सरकारने हिंदी सक्तीचा जीआर रद्द केला. त्यानंतर दोन्ही पक्ष मुंबईत पाच जुलै रोजी विजयी मेळावा घेणार आहे. यामध्ये उद्धव ठाकरे सहभागी होतील. मराठी अस्मिता पुढे नेण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे देखील या निषेधात सहभागी होतील असेही राऊत म्हणाले. यासोबतच संजय राऊत यांनी महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र येण्याचे संकेतही दिले आहेत. या मेळाव्यात युतीसंदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे.
जर शिवसेना (यूबीटी) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) प्रमुख उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचे पक्ष एकत्र आले तर दोन्ही पक्ष मनपा निवडणुका लढवू शकतात. राज ठाकरे यांनी यापूर्वीही महापालिका निवडणुकीत एकत्र लढण्याचे आवाहन केले होते, जे उद्धव ठाकरे यांनी सकारात्मकपणे स्वीकारले. या घडामोडीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन समीकरण निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.
उद्धव आणि राज एकत्र येण्याचा कोणाला फायदा होईल?
मनसे आणि शिवसेना यूटीबीसोबत एकत्र आल्याने मराठी माणसाच्या राजकारणात दोन्ही पक्षांना एक हक्काचे आणि तितकेच प्रखर जाज्वल्य इतिहास असलेले व्यासपीठ मिळेल.
जर दोन्ही पक्ष एकत्र आले तर मराठी मतांसाठी भाजपच्या नियोजनावर परिणाम होईल परंतु मनसेची व्होट बँक मुंबई, ठाणे, नाशिकसारख्या भागात मर्यादित आहे.
जर दोन्ही पक्षांनी युती केली, तर त्यांच्या पारंपारिक मतदारांना हे देखील समजून घ्यावे लागेल की पूर्वी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षावर टीका करणारे राज ठाकरे त्यांच्यात का सामील होत आहेत? अशा परिस्थितीत मत भाजप-एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडेही जाऊ शकतात.
काँग्रेस-राष्ट्रवादीला फटका?
मनसे आणि शिवसेना युटीबीसोबत एकत्र आल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)यांचे नुकसान अटळ दिसते. तर महायुती युतीला याचा फायदा होऊ शकतो. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर मुंबईत या दोन पक्षांना भरघोस मतं पडू शकतात, कारण शिवसेनेला मुंबईत मतदारांचा भक्कम पाठींबा आहे. आगामी काळात राज्यातही ठाकरे बंधूंच्या पक्षांची युती झाल्यास दोन्ही पक्षाला याचा फायदाच होणार आहे.
राज – उद्धव ठाकरेंचा एकत्र संदेश काय आहे?
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये पाच जुलैला मुंबईतील मेळाव्याला वाजत-गाजत या असे म्हटले आहे, यासह खाली राज-उद्धव ठाकरे असे दोघांचे एकत्रित आवाहन छापलेले आहे. ती पोस्ट अशी..
आवाज मराठीचा !
मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का? तर हो नमवलं…!
कोणी नमवलं तर ते तुम्ही, मराठी जनांनी नमवलं ! आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो.
त्यामुळे हा आनंद साजरा करतानासुद्धा, आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत, बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे.
वाजत गाजत या, जल्लोषात, गुलाल उधळत या !! आम्ही वाट बघतोय…
