
जिल्हाप्रमुखपदी रविकिरण इंगवले यांच्या निवडीनंतर नाराज झालेले इतर इच्छुक आणि जिल्हा शिवसेना पदाधिकार्यांची सोमवारी सर्किट हाऊस येथे बैठक झाली. अनेकांनी इंगवले यांच्याविरुद्ध संताप व्यक्त करत भावनांना वाट मोकळी करून दिली.
संजय पवार यांनी आपण उपनेतेपदाचा राजीनामा देत असल्याचे बैठकीत सांगितले. पदाधिकार्यांनी पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा; अन्यथा आमचेही राजीनामे घ्यावेत, असे म्हणत गोंधळ घातला. सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
इंगवले यांच्याविषयी संताप
इंगवले यांच्या माध्यमातून उपरा जिल्हाप्रमुख पक्षश्रेष्ठींनी लादल्याची भावना अनेकांनी बोलून दाखविली. पक्षप्रमुखांकडे दाद मागण्याची विनंती पवार यांच्याकडे केली. मात्र, पवार यांनी जिल्हाप्रमुख निवडीवेळी संपर्कनेत्यांसह इतरांनी आपल्याला विचारले नाही. विश्वासात घेतले नाही. सामान्य पदाधिकार्यांनी उपनेता म्हणून मी न्याय देऊ शकत नाही, असे म्हणत उपनेतेपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे गोंधळ उडाला.
शिवसैनिकांचा पवार यांना घेराव
बैठक संपल्यानंतर लगेच पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन उपनेतेपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. त्यावेळी सहसंपर्कप्रमुख देवणे हे पवार यांना तुमचा हा निर्णय आम्हाला मान्य नसल्याचे सांगून निघून गेले. पत्रकार परिषद संपल्यानंतर शिवसेना पदाधिकार्यांनी पवार यांना घेराव घालून राजीनामा मागे घेण्यासाठी दबाव टाकला. ‘संजय पवार तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है…’ या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. त्यावर पवार यांनी पदाधिकारी आणि शिवसैनिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; पण शिवसैनिक ऐकत नव्हते. त्यानंतरही पवार यांनी राजीनामा निर्णयावर ठाम असल्याचे स्पष्ट केले. दुपारी तीनपर्यंत जिल्ह्याच्या विविध भागांतून आलेले शिवसैनिक आणि पदाधिकारी सर्किट हाऊसमध्ये थांबले होते.