दैनिक चालु वार्ता डहाणू प्रतिनिधी-सुधीर घाटाळ
विक्रमगड,१ जुलै – डहाणू-जव्हार मार्गावरील तलवाडा गावाजवळ मंगळवारी सकाळ च्या सुमारास एस.टी. महामंडळाच्या डहाणू-छत्रपती संभाजीनगर बसचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेली बस समोरून आलेल्या ट्रकला वाचवण्याच्या प्रयत्नात रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली.
या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी बसमधील १४ प्रवाशांपैकी ५ ते ६ प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातावेळी बसमध्ये एकूण २६ प्रवासी होते. धडक लागल्यानंतर इमर्जन्सी खिडकीतून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.
अपघाताचे कारण समोर येताना सांगण्यात आले की, अचानक रस्त्यावर गुरे आली आणि समोरून ट्रक आल्याने चालकाचा तोल गेला. या अपघातानंतर तलवाडा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व मदतकार्य सुरू केले.स्थानिकांचा संताप संरक्षण भिंत नसल्याने अपघात कायमचेच अपघातस्थळी स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करत स्पष्ट आरोप केला की, या ठिकाणी गेल्या दोन वर्षांपासून १०० मीटर अंतराची संरक्षण भिंत अर्धवट अवस्थेतच आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हे काम रखडले असून, त्याचमुळे वारंवार अपघात होत आहेत.
मागील वर्षी याच ठिकाणी म्याझिक गाडी पलटी झाली होती. एक सुरक्षा रक्षक जागीच ठार झाला होता. आता ही मालिका थांबवायची असेल तर संरक्षण भिंत पूर्ण केलीच पाहिजे.
– संजय दोवडे, तलवाडा ग्रामपंचायत सदस्य
समोरून ट्रक आला म्हणून बसचा तोल गेला. रस्त्याच्या कडेला झाडे लावायला हवीत. मी स्वतः किरकोळ जखमी झालोय. बांधकाम विभागाने संरक्षण भिंत बांधलीच पाहिजे.
– अपघातग्रस्त प्रवासी
