दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा-सुरेश ज्ञा. दवणे
जालना (मंठा )
तालुक्यातील तळणी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत कृषी दिनाच्या दिवशीच शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्ज मागण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला “कर्ज मागायला लाज कशी वाटत नाही?” अशा शब्दांत झिडकारल्याचा आरोप शाखाधिकारी बी. जे. केडिया यांच्यावर करण्यात आला आहे.
ही घटना १ जुलै रोजी घडली असून, त्याच दिवशी संबंधित शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. उस्वद येथील प्रगतशील शेतकरी वसंत नायबराव सरोदे यांनी आपल्या मागील थकबाकीची रक्कम – ८२,६११ रुपये – अलीकडेच पूर्णतः भरली होती. त्यामुळे त्यांनी नवीन हंगामी कर्जासाठी बँकेत अर्ज केला.
मात्र, शाखाधिकारी केडिया यांनी इतर शेतकऱ्यांसमोरच त्यांना जाहीरपणे अपमानित करत “कर्ज मागायला वारंवार कशाला येता? लाज कशी वाटत नाही?” अशी टीका केली. कृषी दिनासारख्या शेतकरी सन्मानाच्या दिवशीच शेतकऱ्याचा असा अपमान झाल्याने ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
संतप्त झालेल्या सरोदे यांनी १० जुलै रोजी आत्मदहन करण्याचा इशारा आपल्या निवेदनात दिला असून, प्रशासनाने तत्काळ कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
दरम्यान, या बँक अधिकाऱ्याविरुद्ध यापूर्वीही अशा प्रकारच्या तक्रारी सातत्याने होत असून, खाते होल्ड करणे, कर्ज नाकारणे व ग्राहकांना अपमानित करणे यासारख्या आरोपांची माहिती समोर येत आहे.
🎆महत्त्वाची मागणी
🔷संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने शिस्तभंगाची कारवाई व्हावी
🔷शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी बँकिंग व्यवस्थेत सुधारणा आवश्यक
🔷जिल्हा प्रशासनाने लक्ष घालून शेतकऱ्यांचा विश्वास पुन्हा बहाल करावा
