
राज्यात गुन्हेगारी वाढली असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून खून, मारामाऱ्या, दरोडे यासारख्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अकरावी प्रवेश प्रक्रियेतील यादी पाहण्यावरून झालेल्या वादातून पुणा कॉलेजमध्ये एका तरुणाला लाकडी बांबूने मारहाण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या मारहाणीमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात ७ जणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, १८९(२), १८९(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींपैकी काहीजण ओळखीचे असून दोन अनोळखी इसमांचा समावेश आहे. ही घटना ३० जून रोजी दुपारी १२.१० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी इरफान मोहम्मद हुसेन करणुल (वय ३१, रा. युनिटी पार्क, मलिकनगर, कोंढवा) यांनी लष्कर पोलिसांत तक्रार दिली आहे.
तक्रारदार यांचा भाचा पुणा कॉलेजमध्ये अकरावी प्रवेशासाठी अर्जदार होता. प्रवेश यादी नुकतीच जाहिर झाली. ती यादी पाहण्यासाठी तक्रारदारांचा भाचा गेला होता. तेव्हा यादी पाहताना त्यांच्यात वादविवाद झाले. यानंतर वाद अधिक तीव्र होऊन काही जणांनी कॉलेजच्या आवारात तसेच बाहेर तक्रारदार व त्यांच्या भाच्यावर हाताने, पायाने व लाकडी बांबूने डोक्यावर व अंगावर मारहाण केली. हल्ल्यात तक्रारदार जखमी झाले असून, अधिक तपास पोलीस करत आहेत.
पुण्यात कोयते उगारून टोळक्याची दहशत
वानवडी परिसरात कोयते उगारून टोळक्याने दहशत माजविल्याचा प्रकार घडला आहे. इतकेच नव्हे तर टोळक्याने घराच्या दरवाज्यावर कोयते मारून तसेच खिडकीची काच देखील फोडली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले होते. दरम्यान, दहशत माजविणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांचे साथीदार पसार झाले आहेत. लक्ष्मण राठोड आणि कुणाल मोरे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत तुकाराम कांबळे (वय ५२) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आरोपींबरोबर असलेल्या साथीदारांचा शोध सुरू आहे.