टोळक्याकडून विद्यार्थीला बेदम मारहाण; वासा डोक्यात मारला अन्…
पुण्यातील कॉलेजच्या बाहेर विद्यार्थ्यांच्या टोळक्याने एकाला मारहाण केली. धक्का लागल्याच्या कारणावरुन १० ते १५ विद्यार्थ्यांनी एका विद्यार्थ्याला मारहाण केली.
टोकळ्यातील मुलांनी पीडित विद्यार्थ्याच्या डोक्यात वासा मारला. वृद्धाने मध्यस्थी केल्याने विद्यार्थ्याचे प्राण वाचले. या प्रकरणी पुण्यातील लष्कर पोलीस ठाण्यात विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमधील राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किरकोळ कारणावरून पुण्यातील एका कॉलेज बाहेर विद्यार्थ्यांमध्ये तुफान राडा झाला. दहा-पंधरा विद्यार्थ्यांच्या टोळक्याने मिळून एका विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला केला. हा प्रकार पुण्यातील लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने एका विद्यार्थ्याच्या डोक्यात वासा घालून त्याला गंभीर जखमी केलाय. दरम्यान या विद्यार्थ्यावर सध्या केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी इरफान मोहम्मद हुसेन कर्नुल, यांनी फिर्याद दाखल केली असून ते या जखमी विद्यार्थ्यांचे मामा आहेत. पुण्यातील लष्कर परिसरात असलेल्या एका नामांकित कॉलेजमध्ये नुकत्याच झालेल्या परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला होता. या निकालाच्या यादीत नाव शोधण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती. याच गर्दीत एका विद्यार्थ्याचा इतर काही विद्यार्थ्यांना धक्का लागला. केवळ धक्का लागण्याच्या कारणावरून दहा ते पंधरा विद्यार्थ्यांनी मिळून त्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली.
आरोपी विद्यार्थ्यांनी त्याच्या डोक्यात मोठा लाकडी वासा घातला. मारहाणीत हा विद्यार्थी रक्तबंबाळ झाल्यानंतरही हे विद्यार्थी त्याला मारहाण करत राहिले. त्यावेळी एका वृद्धानं या सगळ्यांना हटकलं आणि या विद्यार्थ्यांच्या हातातून वासा हिसकावून घेतला. त्यामुळे या विद्यार्थ्याचे प्राण वाचले. या गंभीर परिस्थितीतही विद्यार्थ्याने प्रसंगावधान दाखवत त्याच्या मामाला फोन करून घडलेली घटना सांगितली. त्यावेळी मामाने घटनास्थळीत धाव घेत भाच्याला केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. त्याच्यावर सध्या आयसीयूमध्ये उपचार सुरू असून आरोपी विद्यार्थ्यांना विरोधात लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या मारहाणीचा खळबळ जनक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
