
दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी-अविनाश देवकते
लातूर (उदगीर) :‘दैनिक चालू वार्ता’ने दिनांक २३ जून २०२५ रोजी प्रसिद्ध केलेल्या “कचऱ्याच्या दुर्गंधीत आरोग्य धोक्यात” या बातमीची तातडीने दखल घेण्यात आली आहे. नागरिकांच्या तक्रारी आणि माध्यमांनी दिलेल्या प्रसिद्धीनंतर ग्रामपंचायत निडेबन यांच्या वतीने संबंधित परिसरात स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
उदगीर शहरातील कल्पना चौक ते निडेबन रस्त्यावरील अस्वच्छता आणि कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. विशेषतः शाळकरी विद्यार्थी, वृद्ध आणि महिला यांना त्रास सहन करावा लागत होता. या संदर्भातील वृत्त ‘चालू वार्ता’त प्रसिद्ध होताच ग्रामपंचायतीने तत्परता दाखवत साफसफाईचे काम सुरू केले.
सध्या संपूर्ण परिसरात स्वच्छता कर्मचारी काम करत असून, कचऱ्याची उचल, साफसफाई आणि निर्जंतुकीकरणाचे काम सुरू आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने कचरा टाकणाऱ्या नागरिकांना जागरूकतेचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
स्थानिक नागरिकांनी ‘चालू वार्ता’चे आभार मानले असून, “माध्यमांच्या हस्तक्षेपामुळे आमच्या समस्या लवकर सोडवण्यात आल्या. हे जनतेच्या हिताचे आहे,” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
ग्रामपंचायत निडेबनच्या या तातडीच्या कारवाईचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
—