
पुणे शहरात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. कोंढवा येथील एका उच्चभ्रू गृहसंकुलात धक्कादायक घटना घडली आहे. कुरिअर डिलिव्हरीच्या नावाखाली घरात घुसून एका २५ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.
बुधवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही भयावह घटना घडली.
आरोपीने कुरिअर देण्याच्या बहाण्याने सोसायटीत प्रवेश केला. पीडित तरुणी घरात एकटी असताना, पीडितेने ‘माझे कुरिअर नाही’ असे सांगितल्यावरही आरोपीने, ‘सही करणे आवश्यक आहे’ असे सांगत तिला दरवाजा उघडण्यास भाग पाडले. सेफ्टी डोअर उघडताच, आरोपीने तिच्या चेहऱ्यावर स्प्रे मारून तिला बेशुद्ध केले आणि तिच्यावर बलात्कार केला.
दरम्यान, बलात्कारानंतर पीडितेचा मोबाईल घेऊन त्यात आरोपीने एक सेल्फी काढला आणि ‘मी पुन्हा येईन’ असा धमकीवजा संदेश टाईप करून ठेवला, ज्यामुळे घटनेची भीषणता अधिकच वाढली आहे. कोंढवा पोलिसांनी याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे.
दुसरीकडे, प्रसिद्ध आयटी कंपनी इन्फोसिसच्या इलेक्ट्रॉनिक सिटी कॅम्पसमधील एका महिला कर्मचाऱ्याचा शौचालयात व्हिडिओ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ३० जून रोजी घडलेल्या या घटनेत, आपले व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जात असल्याचे उघडकीस आले, महिलेने अलार्म वाजवल्यावर कंपनीचे कर्मचारी धावले आणि आरोपीला पकडण्यात आले. त्याच्या मोबाईलमध्ये वेगवेगळ्या महिलांचे ३० हून अधिक अश्लील व्हिडिओ आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी माळीला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.