
राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला…
मराठीच्या मुद्द्यावर आज तब्बल २० वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र आले. वरळीच्या विजयी मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन भाऊ मंचावर एकत्र दिसले.
हिंदी सक्तीचा शासन आदेश रद्द करायला लावल्यानंतर आज मुंबईमध्ये ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला मुंबईत सुरुवात झाली असून, या मेळाव्यामध्ये सुरुवातीचं भाषण राज ठाकरे यांनी केलं. भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खास ठाकरी शैलीमध्ये जोरदार टोला लगावला आहे. जे बाळासाहेबांना जमलं नाही, इतरांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं, असे राज ठाकरे म्हणाले. भाषण संपल्यानंतर एक भावूक प्रसंग दिसून आला.
ठाकरे बंधू यांच्यातील पहिले भाषण राज ठाकरे यांनी केले. त्यांनी आपले दमदार भाषण संपवल्यानंतर ते जागेवर बसण्यासाठी गेले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज यांचे तोंडभरून कौतुक केले. गेल्या काही वर्षांपासून एकमेकांवर टीका करणारे ठाकरे बंधू यांच्यातील प्रेम दिसून आले. त्यात सुरुवातीला राज ठाकरे आपल्या खुर्चीवर बसायला गेले. त्यावेळी उद्धव यांनी त्यांना हस्तांदोलन केले. त्यानंतर लगेचच ते त्यांच्याशी काहीतरी बोलले आणि अखेर त्यांनी राज यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. त्याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.