
दैनिक चालू वार्ता उप संपादक धाराशिव- नवनाथ यादव
धाराशिव (प्रतिनिधी) : भूम तालुक्यातील अंतरवली (नळी वडगाव) येथे मंजूर असलेले 33/11 केव्हीचे विद्युत उपकेंद्र अद्यापही प्रत्यक्षात उभारले गेलेले नाही. कारण एकच – मंजूर गायरान जमिनीचा ताबा अद्याप विद्युत विभागाला मिळालेला नाही! ही गंभीर बाब लक्षात घेत खासदार ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजे निंबाळकर यांनी भूम तहसीलदारांना लेखी पत्राद्वारे थेट आदेश दिला असून, सदर जमीन “महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित”च्या नावावर तातडीने नोंद करण्यास सांगितले आहे.
दि.३ जुलै २०२५ रोजी धाराशिव येथील खासदार संपर्क कार्यालयात आयोजित जनता दरबारात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख डॉ.चेतन बोराडे यांनी ही बाब मांडली.त्यांनी सांगितले की, अंतरवली येथील गट नं. ७७ मधील ०.६० हेक्टर गायरान जमीन उपकेंद्रासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केली असूनही ताबा दिला गेलेला नाही. यामुळे पाथरूड व अंबी येथील सबस्टेशन्सवरील भार वाढत आहे व तालुक्यातील २४ गावांना वारंवार वीज खंडिततेला सामोरे जावे लागत आहे.
खासदार निंबाळकर यांनी याची तातडीने दखल घेत तहसीलदारांना पत्र लिहून स्पष्ट केलं आहे की, मंडळ अधिकारी व तलाठ्यांमार्फत सदर जमीन तात्काळ ताब्यात देण्यात यावी व ७/१२ उताऱ्यावर “महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित” या नावाने नोंद घेण्यात यावी. हे पत्र क्रमांक OBPR-MP/DHARASHIV/24425/2025 असून दिनांक 03/07/2025 रोजी अधिकृतपणे जारी करण्यात आले आहे.
या उपकेंद्रामुळे परिसरातील वीजपुरवठा सुरळीत होणार असून, शेतकरी, व्यापारी आणि सामान्य नागरिक यांना याचा मोठा फायदा होणार आहे. २४ गावांमधील अनियमित वीजपुरवठा या केंद्रामुळे कायमस्वरूपी सुटेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
या वेळी सरपंच शिवाजी तिकटे, जावेद तांबोळी, सचिन गटकळ, राजेंद्र गटकळ, स्थानिक शेतकरी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.