दैनिक चालू वार्ता उप संपादक धाराशिव- नवनाथ यादव
धाराशिव/चिंचपूर (बु.), परंडा – जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक पी. एम. मोहोळकर यांना शाळेच्या वेळेत मद्यप्राशन करून कर्तव्यावर हजर राहिल्याने अखेर निलंबित करण्यात आले. शिक्षण विभागाने शिस्तभंगाच्या पार्श्वभूमीवर कठोर भूमिका घेतली आहे.
२८ जून रोजी सकाळी ८:०५ वाजता मोहोळकर हे मद्यधुंद अवस्थेत शाळेत आल्याचे निदर्शनास आल्यानंतर मुख्याध्यापकांनी शाळा व्यवस्थापन समितीला याची माहिती दिली. त्यानंतर पालक आणि पदाधिकाऱ्यांनी शाळेत धाव घेतली आणि गटशिक्षणाधिकारी कार्यालयाला तात्काळ कळवले.
विशेष म्हणजे, याआधीही ११ जुलै २०२४ रोजी अशाच प्रकारची नोंद केंद्रप्रमुखांनी शेरापुस्तिकेत केली होती. वारंवारच्या या वर्तणुकीमुळे विभागाची प्रतिमा मलिन होत असल्याचे नमूद करत गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने निलंबनाचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर केला होता.
शिक्षण अधिकारी मापारे यांच्या आदेशानुसार मोहोळकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, त्यांचा धारणाधिकार कळंब येथील गटशिक्षण कार्यालयात ठेवण्यात आला आहे. यावेळी त्यांना परवानगीशिवाय मुख्यालय सोडण्यास मनाई करण्यात आली आहे.
या कारवाईमुळे तालुक्यातील इतर कामचुकार कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, शिस्तभंगाच्या घटनांकडे शिक्षण विभाग आता गांभीर्याने पाहत असल्याचे स्पष्ट झाले आहे.