
अनुपस्थितीमागे राजकीय गणिते कशी ?
शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा शनिवारी ( 5 जुलै ) वरळी डोम येथे विजयी मेळावा पार पडला. या मेळाव्याला खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, शेकापचे जयंत पाटील आणि अन्य पक्षांचे नेते उपस्थित होते.
पण, काँग्रेसच्या एकाही बड्या नेत्याने मेळाव्याला हजेरी लावली नसल्याने तर्क-वितर्क लढवले जात असून राजकीय चर्चा रंगली आहे.
हिंदी सक्तीचे जीआर सरकारने रद्द केल्याचा आनंद साजरा करण्यासाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसेतर्फे वरळीतील एनएससीआय डोम येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, शेकापचे नेते, जयंत पाटील, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, माजी खासदार शिक्षणतज्ञ भालचंद्र मुणगेकर, माकपचे नेते अजित नवले, भापकचे प्रकाश रेड्डी, मराठी भाषा केंद्राचे दीपक पवार उपस्थित होते. पण, प्रदेश काँग्रेसचे किंवा मुंबईतील एकही बडा नेता मेळाव्याला उपस्थित नव्हता.
मराठी आणि हिंदीच्या वादापासून दोन हात लांब राहणे काँग्रेसने पसंत केल्याचे दिसत आहे. मुंबईत झालेल्या आंदोलनातही काँग्रेसच्या नेत्यांनी सहभाग घेतला नव्हता. काँग्रेसच्या नेत्यांना ठाकरेंच्या सेनेकडून निमंत्रण धाडण्यात आले होते. पण, भाजपसोबत काँग्रेसचीही हिंदी मतांवर मदार राहिली आहे. अशावेळी काँग्रेसने ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला गैरहजेरी दर्शवणे पसंत केले आहे.
मराठी हिंदी राजकारण, महापालिकेच्या दृष्टीने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे कितपत एकत्र येतात आणि दोन्ही बंधू एकत्र आले तर महाविकास आघाडी आणि त्यात काँग्रेस राहिल का? असे प्रश्नही उपस्थित होत आहेत. त्यासह दोन्ही बंधूंच्या युतीवर राज्य आणि दिल्लीतील काँग्रेसचे नेते लक्ष ठेवून आहे, असे सांगितलं जात आहे.
बिहार निवडणुकीमुळे काँग्रेसची सावध भूमिका
भाजपसोबत काँग्रेसलाही हिंदीविरोधाची भूमिका परवडणारी नाही. नोव्हेंबर महिन्यात बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडत आहेत. मुंबईसह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बिहारी समाज राहतोय. या बिहारी समाजाचा अजूनही गावाशी संबंध आहे. त्यामुळे इथे काँग्रेसने विरोध केल्यास त्याचा राजकीय लाभ भाजप तिकडे घेऊ शकतो. हे काँग्रेसला परवडणारे नाही. त्यामुळे काँग्रेसच्या एकाही नेत्याने हजेरी न लावत सावध भूमिका घेतल्याचे बोललं जात आहे. तसेच, शरद पवार यांनी सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांना पाठवून ठाकरे बंधूंच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवल्याचे दिसत आहे.