
दैनिक चालु वार्ता उपसंपादक धाराशिव- नवनाथ यादव
धाराशिव/भुम (ता. ६ जुलै) :
पॉलीटेक्निक डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी हाय इन्फोटेक कंप्युटर एज्युकेशन, भुम यांच्या वतीने पंचायत समिती सभागृह येथे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
या कार्यक्रमात तज्ज्ञ मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना २०२५ मधील पॉलीटेक्निक डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया, ऑनलाईन अर्ज कसा भरावा, लागणारी कागदपत्रे, शासकीय व खासगी संस्थांचे मागील वर्षीचे कटऑफ्स, शिष्यवृत्ती योजना अशा अनेक बाबींवर सखोल मार्गदर्शन केले.
मार्गदर्शनासाठी BIT बार्शीचे प्राचार्य रणजित शिराळ सर, गव्ह. पॉलीटेक्निक धाराशिवचे माने सर, IIDE कॉलेज वैरागचे भोसले सर, प्रा. लेकुरवाळे सर (सॉफ्टवेअर इंजिनिअर), प्रा. सरवदे सर आणि प्रा. भालेराव सर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार मांडले आणि पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या शिबिरात भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बार्शी यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन संतोष वरळे (संचालक, हाय इन्फोटेक) यांच्या पुढाकाराने करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पांडुरंग धस सर, शुभम गीते सर, किरण शिंदे सर, अलीम शेख सर, धनवटे सर यांचे व शिक्षक-स्वयंसेवकांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमानंतर BIT कॉलेज बार्शीचे संकुल संचालक ऋतुराज शिवाजीराव सावंत यांच्या वतीने सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना व पालकांना फराळ व अल्पोपहार देण्यात आला.
शिबिरातून विद्यार्थ्यांनी आपले अनेक शंका निरसन करून घेतले असून अशा उपक्रमांमुळे दिशा ठरवण्यास मदत होत असल्याचे समाधान व्यक्त केले.