
दैनिक चालू वार्ता उपसंपादक धाराशिव – नवनाथ यादव
धाराशिव/भूम (प्रतिनिधी): भूम तालुक्यातील ७४ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत प्रक्रिया १० जुलै २०२५ रोजी सकाळी १०.३० वा. भूम येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात पार पडणार आहे. जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या निर्देशानुसार आणि तहसीलदार जयवंत पाटील यांच्या उपस्थितीत ही निर्णायक सोडत होणार आहे.
सन २०२५ ते २०३० या पंचवार्षिक कार्यकाळासाठी ग्रामपंचायतींमध्ये कोणाला नेतृत्वाची संधी मिळणार यावर ही सोडत शिक्कामोर्तब करणार आहे. यासंदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून, अधिकृत अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून गावपातळीवर संभाव्य उमेदवारांची तयारी, प्रचार, बैठका, काही ठिकाणी राजकीय लॉबिंगदेखील सुरू झाले होते. मात्र आता आरक्षणाच्या एका चिठ्ठीवर त्यांच्या भवितव्याची दिशा ठरणार आहे. काहींची आशा फळाला जाणार, तर काहींचे स्वप्न आरक्षणातच मोडून पडणार, हे नक्की.
या कार्यक्रमाच्या पारदर्शकतेसाठी ही आरक्षण सोडत सार्वजनिकरीत्या घेतली जाणार आहे.प्रतिनिधींनी,ग्रामपंचायतीतील इच्छुक सरपंच/सदस्य, ग्रामस्थ व संबंधितांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार जयवंत पाटील यांनी केले आहे.