
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात कोणीही बोलू नये, असे आदेश उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षातील प्रवक्ते व नेत्यांना दिले आहेत.
हिंदी सक्तीचा शासकीय आदेश रद्द करण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयावर जल्लोष करण्यासाठी उध्दव ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या वतीने आयोजित केलेला विजयी मेळावा शनिवारी वरळीत पार पडला.
या मेळाव्यात ना कुठला पक्ष, ना कुठला झेंडा अशी भूमिका राज ठाकरेंची होती. त्यांनी आपल्या भाषणात मराठी भाषेचा मुद्दा अधोरेखित करताना शिंदे गटावर टीका केलेली नाही, तर उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात हिंदीसक्ती, मराठी भाषा सोडून शिंदे गटावर टीका केली होती. त्यामुळे राज ठाकरे यांची भूमिका पाहता त्यांच्यावर कोणीही टीका करू नये किंवा त्यांच्याविरोधात कोणीही बोलू नये, असे आदेशच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या नेत्यांना तसेच प्रवक्त्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राज ठाकरेंचाही पदाधिकार्यांना आदेश
ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीची चर्चा सुरू असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपल्या पदाधिकार्यांना शिवसेनेसोबतच्या युतीबद्दल बोलू नका, असा आदेश दिला आहे. युतीबद्दल काहीही बोलण्यापूर्वी पदाधिकार्यांनी माझी परवानगी घ्यावी, अशी तंबीच त्यांनी दिल्याचे समजते. त्यामुळे उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबद्दल राज ठाकरेंची ही सावध भूमिका असल्याचे बोलले जात आहे. पण, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या दोन वेगवेगळ्या आदेशाने ठाकरेंच्या युतीबद्दल तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.