
थेट आझाद मैदानात जात आंदोलक शिक्षकांसमोर शरद पवारांनी सरकारला सुनावलं !
मागील चार दिवसांपासून राज्यभरातील विनाअनुदानित शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आझाद मैदानात तळ ठोकला आहे. आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत हे मैदान सोडणार नाही, असा आक्रमक पवित्रा या शिक्षकांनी घेतला आहे.
या आंदोलनाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीने जाहीर पाठिंबा दिला आहे. आमदार रोहित पवार हे आझाद मैदानावर तळ ठोकून आहेत. अशातच आज जेष्ठ नेते शरद पवार यांनी आझाद मैदानात येऊन शिक्षकांशी संवाद साधला. शिक्षकांवर संघर्ष करण्याची वेळ येणं हे महाराष्ट्रासाठी अशोभनीय असल्याचं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं.
शिक्षकांना काही चिंता करू नये एका दिवसाच्या आत तुमची मागणी मार्गी लावतो असं आश्वासन देखील पवारांनी यावेळी दिलं. आंदोलक शिक्षकांची भेट घेण्यासाठी शरद पवारांसोबत राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके देखील आले होते.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, राज्य शासनाने शिक्षकांच्या केलेल्या कामाचा मोबदला दिला पाहिजे. वेतन देण्याचा आदेश काढायचा आणि तरतूद मात्र करायची नाही. म्हणजे आदेशाचा कागद कचऱ्याच्या पेटीत टाकायचा असं सरकारचं काम आहे.
राज्याची जबाबदारी आहे की जे जे गरजेचं आहे त्याची तरतूद करून. लोकांना न्याय देणं आणि ही जबाबदारी सरकारला टाळता येणार नाही. माझी विनंती आहे की शिक्षक नवी पुढी घडवणारा घटक असून त्याच्यावर असा संघर्ष करण्याची वेळ येणं ही गोष्ट महाराष्ट्राला शोभणारी नाही. ज्यांच्याकडे ज्ञानदानाची जबाबदारी त्यांच्यावर संघर्ष करण्याची वेळ येऊ देऊ नका, हेच माझं राज्य सरकारला सांगणं आहे..
त्यामुळे लवकरात लवकर त्यासाठी लागेल त्या निधीची तरदूत करा आणि तो द्यायला सुरूवात करा आणि राज्यात शिक्षकांचा सन्मानच करा, असं आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगू असं शरद पवार यावेळी म्हणाले. शिवाय याबाबतचा निर्णय एका दिवसाच्या आत निर्णय घ्यावा त्यापेक्षा जास्त वेळ लावू नये. प्रशासनाचं मला थोडं फार समजतं.
प्रशासना संबंधी काही काळजी करू नका. 56 वर्षांपासून मी विधानसभा, लोकसभा, राज्यसभेमध्ये काम केलं आहे. त्यामुळे कसा निर्णय घ्यायचा कशी तरदूत आणायची असते आणि तुम्हाला कशी द्यायची असते ते मला माहिती आहे, असं म्हणत त्यांनी शिक्षकांना निश्चिंत रहा असा सल्ला दिला.