
आंदोलनस्थळी शरद पवार दाखल !
विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा म्हणजेच वाढीव रक्कम मिळावी या मागणीसाठी शिक्षक आक्रमक झालेले आहेत. शिक्षक समन्वय संघाकडून 5 जूनपासून मुंबईतील आझाद मैदानात सरकराविरोधात आंदोलन सुरु करण्यात आलं आहे.
गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या या आंदोलनाला विरोधी पक्षांकडून समर्थन दिलं जात आहे. या आंदोलनात राज्यभरातील जवळपास 20 हजारांहून अधिक शिक्षक सामील झाले असून ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.
अनेक नेते आंदोलनस्थळी भेट देत शिक्षकांना पाठिंबा दर्शवत आहेत. या आंदोलनाला शरद पवारांच्या राष्ट्रवादींचे आमदार रोहित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट देत शिक्षकांचं म्हणणं ऐकून घेतलं आहे. दरम्यान, आज शरद पवार आझाद मैदानावर दाखल झाले असून, शिक्षकांची संवाद साधत आहेत. शरद पवारांसह खासदार निलेश लंके व रोहित पवार देखील येथे उपस्थित आहेत.
शरद पवार यावेळी म्हणाले की, ‘शिक्षकांच्या मागण्या महत्वाच्या आहेत. त्यासाठी त्यांना संघर्ष करण्याची वेळ येत आहे. शिक्षक आंदोलनासाठी येऊन चिखलामध्ये बसत आहेत हे बरोबर नाही. तरतूद न करण्यात आलेला आदेश हा कचरा टाकण्यासारखाच आहे. ज्ञानदाना करणाऱ्या शिक्षकांवर अशा पद्धतीने संघर्ष करण्याची वेळ येऊ देऊ नका.’ अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी यावेळी दिली आहे.
शिक्षकांचं आंदोलन कशासाठी?
राज्यातील सुमारे 5,000 खासगी विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्याने अनुदान देण्याचा निर्णय ऑक्टोबर 2024 मधील अधिवेशनात घेण्यात आला होता. मात्र, अद्यापही या निर्णयाची अंमलबजाव करण्यात आलेली नाही. त्यामुळे विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक संतप्त झालेत. शासनाच्या या भूमिकेचा निषेध करण्यासाठी आणि राज्यातील विनाअनुदानित शाळांना अनुदानाच्या वाढीव टप्पा मिळावा या मागणीसाठी शिक्षकांनी हे आंदोलन सुरू केले आहे.