
एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंचे मुंबईतील बऱ्यापैकी केडर उद्ध्वस्त केले आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी केडर उभे केले, प्रभाग बांधले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत चांगले मतदान झाले.
ठाकरेंच्या सेनेला बऱ्यापैकी यश मिळाले ते मुंबईतच मिळाले आहे. अशात आता मनसेसोबत युती झाली तर ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी बांधलेले प्रभाग मनसेला देणार का? अडचणीच्या काळात साथ दिलेल्यांवर, पक्षासोबत राहिलेल्यांवर ठाकरे अन्याय करणार का? असा सवाल सतावत आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्यामुळे सध्या निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाने सुरू केली आहे. कुठल्याही परिस्थितीत मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकण्याचे प्लॅनिंग भाजपने (BJP) केले आहे. त्याची तयारी गेल्या अनेक दिवसापासून सुरु आहे. मुंबई महापालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरेंचे वर्चस्व होते. मात्र, आता शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतर मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजपचे प्लॅनिंग सुरु आहे. मात्र, दुसरीकडे ठाकरे बंधू मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आल्याने अडचणीत वाढ झाली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने गेल्या काही दिवसापासून सुरु केली आहे. त्यासाठीची रणनीती आखण्यात आली आहे. त्यामुळे एकीकडे ठाकरे बंधू एकत्र आल्याचा फायदा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व राज ठाकरे दोन्ही बंधूना होणार असले तरी युतीच्या तडजोडीत उद्धव ठाकरे यांना त्यांच्या हक्काच्या काही प्रभाग सोडावे लागणार असल्याने काहीसे चिंतेचे वातावरण आहे. युती झाल्यास मनसे २२७ जागापैकी ७० ते ८० जागांवर दावा करू शकते, त्यामुळे उद्धव ठाकरे किती जागा सोडणार याची उत्सुकता लागली आहे.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेना व मनसेची ताकद मराठी भाषिक पट्ट्यात आहे. त्यामुळे या भागातील प्रभागावर या दोन्ही पक्षाचा डोळा असणार आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष या जागांवर दावा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यावरून दोन्ही पक्षात ताणाताणी होण्याची शक्यता आहे. विशेषतः उद्धव ठाकरेंचे मध्य मुंबईत मोठे वर्चस्व आहे. त्यामुळे या भागातील जागा ते सहजासहजी सोडतील असे वाटत नाही.
त्यासोबतच उद्धव ठाकरेंचा दादर, लालबाग, वरळी, परळ, शिवडी, विक्रोळी, वडाळा, अंधेरी पूर्व, मालाड पूर्व, गोरेगाव या मराठी वस्तीत पूर्वीपासून प्राबल्य आहे. त्यामुळे या भागातील काही प्रभागावर मनसे दावा करण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांचे दादर, माहीम, कुलाबा, भायखळा, विक्रोळी, भांडुप, घाटकोपर, चांदवली या भागात वर्चस्व आहे. त्यामुळे या भागातील प्रभागावर मनसेचे लक्ष असणार आहे
त्यामुळे येत्या काळात या प्रभागावरून मनसे व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत मतभेद होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांचा प्रभाव असलेल्या भागातील प्रभागावर मनसेने दावा केला तर मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे हेच महत्वाचे प्रभाग सोडले तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात होणारे जागावाटप देखील कळीचा मुद्दा ठरणार आहे.