
पहिले भारताबद्दल ओकली गरळ आणि आता पाकिस्तानचे सर्व सीक्रेट्स केले जगजाहीर…
पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि पीपीपीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पाकिस्तानच्या दहशतवादाशी संबंधांबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
त्यांनी थेट कबूल केले की पूर्वी पाकिस्तानातील काही गट भारताविरोधात दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी होते. मात्र, आज पाकिस्तान बदलला असून देशात अशा संघटनांविरोधात कठोर पावले उचलण्यात आली आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
भुट्टो यांच्या या वक्तव्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे कारण ते पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर समोर आले आहे. या हल्ल्यातील जबाबदारी टीआरएफ या संघटनेने स्वीकारली असूनही, भुट्टो झरदारी यांनी टीआरएफबद्दल काही बोलण्याचे टाळले. एवढेच नाही, तर संयुक्त राष्ट्रांमध्ये टीआरएफला दहशतवादी संघटना घोषित करण्याच्या प्रक्रियेत पाकिस्तानने अडथळा आणल्याचाही आरोप भारताने केला आहे.
पाकिस्तानमध्ये ‘अंतर्गत युद्ध’
मुलाखतीदरम्यान भुट्टो म्हणाले की, पाकिस्तानने आतापर्यंत दहशतवादामुळे ९२,००० लोक गमावले आहेत. २०२३ मध्येच सुमारे १,२०० नागरिक दहशतवादी हल्ल्यांचे बळी ठरले. त्यांनी या संघर्षाला पाकिस्तानमधील ‘सर्वात मोठे अंतर्गत युद्ध’ असे संबोधले. ते म्हणाले, ‘मी स्वतः दहशतवादाचे बळी अनुभवले आहेत. त्यामुळे पीडितांचे दुःख मला समजते.’
भारताने उपस्थित केलेले तीव्र प्रश्न
भारताच्या एका माध्यम संस्थेने मुलाखतीत भुट्टोंना विचारले की, पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांनी २०१५ मध्ये डॉन न्यूजला दिलेल्या मुलाखतीत कबूल केले होते की पाकिस्तान लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद यांना प्रशिक्षण देत होता. हाफिज सईद आणि लख्वी हे पाकिस्तानचे नायक असल्याचेही त्यांनी म्हटले होते. या प्रश्नावर भुट्टो म्हणाले, ‘९/११ नंतर जगाने अशा गटांना दहशतवादी म्हटले, पण त्याआधी ते स्वातंत्र्यसैनिक मानले जात होते.’
हाफिज सईद आणि मसूद अझहरबाबत मोठा दावा
बिलावल भुट्टोंनी अल जझीरा या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भारताला मोठी ऑफर दिली आहे. त्यांनी म्हटले की, ‘जर भारत आणि पाकिस्तान परस्पर संवाद साधतील, तर पाकिस्तान हाफिज सईद आणि मसूद अझहर यांच्याविषयी सहकार्य करू शकतो.’ त्यांनी असा दावा केला की, ‘हाफिज सईद सध्या तुरुंगात आहे आणि मसूद अझहर पाकिस्तानमध्ये नसून अफगाणिस्तानात लपला आहे.’
भारताची ठाम भूमिका
भारत सरकारने स्पष्टपणे म्हटले आहे की कोणत्याही स्वरूपात दहशतवाद सहन केला जाणार नाही. २६/११, पुलवामा आणि आता पहलगाम हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या गटांवर कठोर कारवाई व्हावी, अशी भारताची सातत्याने मागणी आहे. मात्र पाकिस्तान दरवेळी जबाबदारी नाकारत किंवा टाळत राहतो.