
बसचालकाचा मृत्यू; 9 प्रवासी जखमी…
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खंडाळा घाटात गुरुवारी (दि. 10) पहाटे अडीच वाजता एसटी बस व कंटेनर यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात एसटी बसचालकाचा जागीच मृत्यू झाला असून, नऊ प्रवासी जखमी झाले आहेत.
यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे.
अपघातात मृत्यू झालेल्या बसचालकाचे नाव इर्शाद अब्दुल मजीद शेख (वय 38, रा. आष्टी, बीड) असे आहे. बारामती येथून मुंबईकडे जाणारी एसटी बस (एमएच 14/केक्यू-4956) खंडाळा घाटातील कुणे पुलाजवळील वळणावर असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बसने समोरून जात असलेल्या कंटेनरला (आरजे29/ जीए 9994) मागून जोरदार धडक दिली.
अपघातात बसमधील नऊ प्रवासी जखमी झाले असून, यामध्ये तिघेजणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींमध्ये बसचे वाहक सागर दत्तात्रय गुंड (रा. आष्टी, बीड), आप्पा ओळकुंटे (67, माळेगाव, बारामती), प्रियंका खरात (26) व मीना खरात (52, भिवंडी), ऋतुजा हुबाळे (16, कुर्ला), अनिल कुटे (59) व अक्षय कुटे (31, कासारवाडी), प्रणय चव्हाण (25, सांताक्रूझ) आणि महेश शिंदे (28, सांताक्रूझ) यांचा समावेश आहे.
अपघाताची माहिती मिळताच खंडाळा महामार्ग पोलिस, लोणावळा शहर पोलिस, देवदूत आपत्कालीन पथक आणि आयआरबी पथक घटनास्थळी दाखल झाले. या अपघातामुळे काहीकाळ मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती.