
निकृष्ट जेवण दिलं म्हणून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवसाच्या कँटीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. या प्रकरणी मोठा गदारोळ उठला आहे.
विरोधकांकडून महायुती सरकार आणि संजय गायकवाड यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. ठाकरे गटाचे मुखपत्र सामनातूनही गायकवाड यांच्या या कृत्याचा समाचार घेण्यात आला. खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. त्यांच्या याच टीकेवर आज आमदार गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले. माझा मार्ग चुकीचा होता पण साध्य मात्र बरोबर होतं असे गायकवाड म्हणाले होते.
गायकवाडांची जीभ घसरली
संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना गायकवाड म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केल्यानंतर पहिलं आंदोलन दक्षिण भारतीय लोकांविरुद्ध केलं होतं. कारण त्या लोकांनी मुंबई उद्धवस्त करण्याचं चालवलं होतं. अख्ख्या मुंबईत लेडीज बार, डान्स बार लावून महाराष्ट्राची संस्कृती खराब केली. आमची तरुणाई बरबाद केली. मी ज्याला मारलं तो देखील शेट्टीच आहे. इकडे मराठी मराठी करता मग आता त्या शेट्टीचा इतका पुळका का आला.
संजय राऊतच्या काय मायचा नवरा आहे का तो शेट्टी? त्याला मी आतंकवादी वाटतो का? जो शेट्टी आमच्या लोकांना खराब अन्न खाऊ घालत होता आज सिद्ध झालं. 79 प्रकारच्या त्रुटी म्हणजे 79 प्रकारच्या नियमांचं उल्लंघन त्या हॉटेलवाल्यांनी केल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. हा माझा मोठा विजय आहे. एवढंच होतं की त्याला कुणी वाचा फोडत नव्हतं. मनात सगळ्यांच्या होतं पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण असा प्रश्न होता तर तो मी बांधला.
मला मान्य आहे की माझा मार्ग चुकीचा होता. रस्ता गलत था लेकीन मंझिल सही थी हे मी कालच सांगितलं होतं. मला कायदा हातात घ्यावा लागला. इच्छा नसताना घ्यावा लागला कारण त्याशिवाय या कँटीनवर कारवाई होऊ शकत नव्हती.
तुमच्या राजीनाम्याची मागणी आता विरोधकांकडून केली जात आहे असे विचारले असता गायकवाड म्हणाले, ज्याला मारहाण केली तो काहीच बोलत नाही बाकीच्यांना का इतका पुळका येत आहे? ज्याला मारहाण झाली तो तर एक शब्दही बोलायला तयार नाहीत त्याने तक्रार सुद्धा दिलेली नाही. त्याला माहिती आहे की आपण चूक केलेली आहे. त्याला मान्य आहे मान्य नसतं तर त्याने तक्रार दिली असती. ज्याच्याबरोबर झालं तो काहीच बोलत नाही मग हे बाकीचे चोर का बोंबलत आहेत? असा सवाल गायकवाज यांनी उपस्थित केला.