
दैनिक चालु वार्ता डहाणू प्रतिनिधी-सुधीर घाटाळ
डहाणू | ११ जुलै २०२५ सरावली येथील आरोग्य तपासणी शिबिरात अनुपस्थित राहिल्याप्रकरणी डॉ. कृणाल सोनावणे यांच्यावर सेवा समाप्तीची कारवाई झाली असून, “दै. चालू वार्ता” ने उघडकीस आणलेल्या या मुद्द्याची जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घेतली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. मनोज रानडे यांनी ही कठोर कारवाई केली.
याच आठवड्यात सरावली येथे भरवण्यात आलेल्या गरोदर महिलांच्या आरोग्य तपासणी शिबिरात भरारी पथकातील डॉक्टर डॉ. सोनावणे हे विनापरवानगी अनुपस्थित होते. दै. चालू वार्ता ने ही बाब उचलून धरल्यानंतर समाजमाध्यमांवर आणि आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली.
त्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने चौकशीचे आदेश दिले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली ही चौकशी झाली. अहवालात सेवा कसुरीचे ठोस पुरावे आढळून आले. त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी यांच्या शिफारशीनुसार, सीईओ रानडे यांनी सेवा समाप्तीचे आदेश दिले.
प्रशासनाच्या या तत्परतेचे आणि कार्यवाहीचे सर्वत्र कौतुक होत आहे. शासकीय सेवेतील उत्तरदायित्व अधोरेखित करणाऱ्या या निर्णयामुळे इतर कर्मचाऱ्यांसाठीही ही घटना एक धडा ठरत आहे.