
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी गंगाखेड-प्रेम सावंत
गंगाखेड: शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्गाचे काम सध्या संथ गतीने सुरू आहे. मात्र कामाच्या दरम्यान प्रशासन व ठेकेदार यांचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर आला आहे. शहरात असलेल्या दत्त मंदिर चौकात रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, नागरिकांना आणि वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
सध्या एका बाजूने रस्ता पूर्णपणे खोदण्यात आलेला आहे आणि दुसऱ्या एका अरुंद बाजूने संपूर्ण वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी तर होतेच, पण त्यात रस्त्यावर पडलेले खोल खड्डे हे अपघातांना आमंत्रण देत आहेत. विशेष म्हणजे, या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
स्थानिक व्यापारी, रहिवासी व वाहनचालकांनी या समस्येवर त्वरित उपाय करण्याची मागणी केली आहे.
रस्त्याचे काम सुरू आहे हे ठीक आहे, पण लोकांच्या सुरक्षेची जबाबदारीही प्रशासनाने घ्यावी. दत्त मंदिर चौकात खड्ड्यांमुळे अनेक वेळा दुचाकीस्वार घसरले आहेत. जर मोठा अपघात झाला, तर जबाबदार कोण?” असा संतप्त सवाल नागरिकांमधून केला जात आहे. तसेच ठेकेदारास कठोर सूचना देण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाला केले आहे.