
बुलढाणा जिल्हा परिषदेच्या विविध शाळांतील पटसंख्या कमी होण्याकरिता शिक्षकाना तात्पुरते निलंबित करण्यात आले असून यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या जातील, असे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी आज (11 जुलै) विधान परिषदेत सांगितले.
विधान परिषदेत सदस्य जगन्नाथ अभ्यंकर यांनी लक्षवेधीद्वारे प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी सदस्य धीरज लिंगाडे यांनी चर्चेत सहभाग घेतला.
मंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, चिखली, सागवण, भादुला आदी शाळांचे पटसंख्या चार ते सहा पर्यंत कमी झाली होती. अशा 20 शाळांमधील कार्यरत 30 शिक्षकांचे निलंबन कायम स्वरुपी नाही. या शिक्षकांनी पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केल्यास व पटसंख्येत वाढ दिसून आल्यास, निलंबनाबाबत पुनर्विचार करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एक ते दहा पटसंख्या असलेल्या 45 शाळांवर कार्यरत शिक्षकांकडून सन 2020-21 ते सन 2024-25 या पाच वर्षाच्या पटसंख्येचा अहवाल घेतला असता पटसंख्येबाबत संबंधित शाळांच्या शिक्षकांना घटलेल्या पटसंख्येच्या प्रश्नाबाबत समर्पक खुलासा देता आला नाही. त्यामुळे गत पाच वर्षात सातत्याने पटसंख्या कमी होण्याकरिता दीर्घ कालावधीपासून त्याच शाळेवर कार्यरत असलेले शिक्षक जबाबदार असल्याचे आढळून आले होते.
या शाळांवरील पटसंख्येबाबत गत आठवड्यात पुनःश्च आढावा घेतला असता, 45 शाळांपैकी 37 शाळांमध्ये पटसंख्या लक्षणीयरित्या वाढली असल्याचे दिसून आले आहे. प्रयत्नपूर्वक पटसंख्यावाढ केलेल्या शिक्षकांचे निलंबन मागे घेण्याबाबत पुनर्विचार करण्यात येणार आहे, असे मंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी सांगितले.