
मुलीला मारण्यापूर्वी मी मुलाला…
हरियाणातील गुरुग्राममधील युवा , होतकरू खेळाडू, टेनिसपटू राधिका यादव हिच्या हत्येने संपूर्ण देशाला हादरवून टाकलं आहे. तिच्या हत्येस जबाबदार असलेले, या प्रकरणातील आरोपी हेच राधिकाचे वडीलच असून त्यांनीच तिच्यावर गोल्या झाडल्या.
सुरूवातीला वडीलांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र नंतर त्यांनी हत्येची कबुली दिली. परंतु ते वारंवार वेगवेगळी विधाने करत होते. त्यातच आता त्याने पोलिसांना एक नवीन गोष्ट सांगितली. मी राधिकाला मारण्याचा आधीच प्लॅन केला होता असं त्यांनी कबूल केलं. मुलीला मारण्याचं ठरवल्यामुळेच, मी माझ्या मुलाला बाहेर पाठवले. जर तो घरी असता तर राधिका वाचली असती. माझी पत्नी आजारी होती, म्हणून ती खोलीत आराम करत होती. मी स्वतः संपूर्ण प्लॅन बनवला होता, असं राधिकाच्या वडिलांनी पोलिसांसमोर कबूल केलं.
“गुरुवारी सकाळी 10:30 च्या सुमारास, राधिका सुशांत लोक-2 च्या ब्लॉक-जी मधील आमच्या तीन मजली घरातील स्वयंपाकघरात नाश्ता बनवत होती. तेव्हाच मी तिच्या पाठीवर चार गोळ्या झाडल्या” असं 51 वर्षीय दीपक यादव म्हणाले.
दूध आण सांगत मुलाला बहेर पाठवलं अन् साधला डाव
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक यादव यांनी नियोजनबद्ध पद्धतीने त्यांच्या मुलाला आधी घराबाहेर पाठवलं आणि मग राधिकाची हत्या केली. खरंतर रोज सकाळी दीपक यादव हे स्वतः दूध आणायला जायचे, पण गुरुवारी त्यांनी हे काम त्यांच्या मुलाकडे सोपवलं. त्यानंतर राधिका एकटीच होती, हे पाहून त्यांनी मुलीवर गोळीबार केला. त्या दिवशी घरात दुसरं कोणीही नसावं अशी दीपकची इच्छा होती अशी माहिती गुरुग्राम पोलिसांचे पीआरओ संदीप कुमार यांनी दिली.
राधिकावर अंत्यसंस्कार
पोस्टमॉर्टमनंतर राधिकाचा मृतदेह तिच्या कुटुंबियांना सोपवण्यात आला. राधिकाच्या शरीरातून एकूण 4 गोळ्या निघाल्या. एक गोळी कुठे गेली याचा शोध पोलिस घेत आहेत. शुक्रवारी संध्याकाळी गुरुग्राममधील वजीराबाद गावातील स्मशानभूमीत राधिका यादववर अंत्यसंस्कार करण्यात आले.राधिकाचा मोठा भाऊ धीरज यादवने विधीनुसार अंत्यसंस्कार केले. या भयानक घटनेनंतर कुटुंब आणि संपूर्ण गावातील लोक खूप दुःखात आहेत आणि कोणीही काहीही बोलण्याच्या स्थितीत नाही. गावातही शोक आणि शांततेचे वातावरण आहे. एक बाप स्वतःच्या मुलीशी एवढं भयानक वागून तिचा जीव कसा घेऊ शकतो हे कोणालाही अद्याप समजू शकलेलं नाही.
दरम्यान शुक्रवारी सेक्टर-56 पोलिसांनी आरोपी वडील दीपक यादव यांना न्यायालयात हजर केले आणि त्यांची दोन दिवसांची रिमांड मागितली. रिमांडबाबत न्यायालयात वादविवाद झाला आणि त्यानंतर पोलिसांना एक दिवसाची रिमांड मिळाली. रिमांड दरम्यान, पोलिस दीपक यादवची चौकशी करतील तसेच रिव्हॉल्व्हरशी संबंधित शस्त्र जप्त करण्यासाठी कसन येथे जातील.