
बावनकुळे म्हणतात; याचा अर्थ ते पक्ष सोडणार…
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजीनामा दिला आहे. ते नाराज आहेत, काही नेत्यांसोबत त्यांचे पटत नाही त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत.
यावर भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सर्व अफवा असल्याचे सांगितले. बदल हा प्रक्रियेचा भाग असतो. ते अनेक वर्षे प्रदेशाध्यक्ष होते. त्यामुळे राजीनामा दिला. याचा अर्थ ते पक्ष सोडणार असा होत नाही, असेही चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमाताच जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, शरद पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक असल्याने त्यांना थांबण्याचा सल्ला दिला होता. अद्याप स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जाहीर व्हायच्या आहेत. त्यापूर्वीच पाटील यांनी राजीनामा दिल्याने वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी यापूर्वीसुद्धा जयंत पाटील (Jayant Patil) भाजपच्या संपर्कात नसल्याचे स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही युवा नेत्यांसोबत त्यांचे पटत नसल्याचे बोलले जाते. ते भाजपात जाणार अल्याचेही दावे केले जात होते. यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. त्या त्या वेळी असेच दावे केले जात होते.
मात्र, जयंत पाटील यांनी विकासकामांसाठी भेटल्याचे सांगून पक्ष सोडणार आणि भाजपात जाणार असल्याचे वृत्त फेटाळून लावले होते. कालच राष्ट्रवादी काँग्रसने आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. शशिकांत शिंदे त्यांची जागा घेणार असल्याचे बोलले जात आहे.
यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रत्येक पक्षात वरिष्ठ नेतृत्व किंवा संघटना निर्णय घेत असते. तेव्हा प्रदेशाध्यक्ष बदलत असतात. रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले, पूर्वी मी होतो. हा संघटनेच्या प्रक्रियेचा भाग आहे. जयंतराव खूप दिवसांपासून तिथे प्रदेशाध्यक्ष होते. त्यांना बदलले हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रक्रियेचा भाग असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.