
शिवसेना-मनसे युतीचं गाडं कधी पुढे सरकणार ?
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे विजयी मेळाव्यात एकत्र आल्यावर आता मनसे (MNS) आणि शिवसेना युतीचे वारे वाहात आहेत. उद्धव ठाकरे यांनी याबाबत आता अनौपचारिक गप्पांमध्ये भाष्य केलंय.
मनसेशी युतीबाब सकारात्मक असल्याचं त्यांनी म्हटलंय अशी सूत्रांची माहिती आहे. युतीबाबत सध्या टप्प्याटप्प्याने प्रक्रिया सुरू आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. मेळाव्यानंतर ठाकरे बंधू एकत्र येऊ नये म्हणून अनेकांकडून प्रयत्न झाले, यापुढेही होतील असं उद्धव ठाकरे म्हणाले. निवडणुका जाहीर झाल्यावर युतीचा निर्णय होईल, असं उद्धव ठाकरे या अनौपचारिक गप्पांमध्ये म्हणाले अशी सूत्रांची माहिती आहे.
एकीकडे उद्धव ठाकरे युतीबाबत सकारात्मक असल्याचं बोलत असले तरी राज ठाकरेंनी सावध पवित्रा घेतलाय. नोव्हेंबर डिसेंबरदरम्यान चित्र स्पष्ट होईल त्यानंतर युतीसंदर्भात बघू असं राज यांनी इगतपुरी इथे अनौपचारिक गप्पांमध्ये म्हटलंय. विजयी मेळावा केवळ मराठीच्या मुद्द्यावर होता, त्याचा राजकारणाशी संबंध नाही. नोव्हेंबर-डिसेंबरदरम्यान चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर युतीसंदर्भात बघू, असे राज ठाकरे म्हणाले. एकूण ठाकरेंची शिवसेना युतीबाबत टाळी देत असताना राज ठाकरेंनी सावध पवित्रा घेतलाय.
बाळा नांदगावकरांच्या एकटं लढण्याच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरे काय म्हणाले?
आतापर्यंत आम्ही एकट्यानेच निवडणूक लढवली आहे, त्यामुळे आताही वेळ आली तर एकटे निवडणूक लढवू, असे वक्तव्य मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केले होते. यावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, 5 जुलैला आम्ही एकत्र आलो होतो स्पष्टपणे ते एका गोष्टीसाठी, ती म्हणजे तिसऱ्या भाषेच्या सक्तिविरोधात. निवडणुकांचं वातावरण दिसत आहे. आमच्या बाजूने जे काय महाराष्ट्राच्या मनात आहे ते आम्ही करु असे आदित्य ठाकरे म्हणाले. आम्ही राजकारण पाहत नाही आम्ही महाराष्ट्राचं हित पाहतो, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यस्तरीय शिबिराचा आजचा दुसरा दिवस
मनसेच्या राज्यस्तरीय शिबिराचा आजचा दुसरा दिवस आहे. या शिबिरासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे कालच इगतपुरीमध्ये दाखल झाले होते. या शिबिरासाठी राज्यातील मनसेच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती आहे. राज ठाकरे आज नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत सुरू असलेल्या युतीच्या चर्चासंदर्भात राज ठाकरे काय मार्गदर्शन करतात याकडे लक्ष. विजयी मेळावा हा केवळ मराठीच्या मुद्यावर होता, त्याचा राजकारणाशी संबंध नव्हता, नोव्हेंबर डिसेंबर पर्यत चित्र स्पष्ट होईल त्यांनतर युती संदर्भात बघू असे, सूतोवाच राज ठाकरेंनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पामध्ये केल्याने या शिबिराकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.