
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाच्या काही दिग्गजांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी(अजित पवार) यांच्या पक्षात प्रवेश केला. माजी मंत्री गुलाबराव देवकर तसेच डॉ. सतीश पाटील, माजी आमदार दिलीप सोनवणे, कैलास पाटील यांनी त्यांच्या शेकडो समर्थकांसह अजित पवार गटाची वाट धरल्याने शरद पवार यांच्या पक्षाला मोठा हादरा बसला.
त्यातून पक्ष सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच आता महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेच शरद पवार यांच्या गटाला धक्का दिला आहे.
शरद पवार यांच्या पक्षातील सामाजिक न्याय विभागाचे जळगाव जिल्हाध्यक्ष तथा भारतीय एसटी कामगार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक सोनवणे यांनी यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन महाविकास आघाडीतीलच शिवसेनेत म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. शिवाय त्यांनी आपल्या नाराजीचं कारणही सांगितलं आहे. जिल्ह्यात पवार गटात सध्या सुरू असलेल्या कलहाविषयी त्यांनी भाष्य केलं आहे.
मी शरद पवार गटावर नव्हे तर, जिल्ह्यातील काही नेत्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचं सोनवणे यांनी सांगितलं आहे. शरद पवार गटात मागासवर्गीयांच्या अडचणी कुणीही समजून घ्यायला तयार नाही. याउलट त्यांना एकाकी पाडले जात आहे. जिल्हा कार्यकारिणीतही मागासवर्गीयांना कोणतेच स्थान नाही. त्यामुळे आपण पक्ष सोडल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
एकीकडे, पक्षाची गळती रोखण्यासाठी पक्षाचे निरीक्षक भास्करराव काळे, जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वात प्रयत्न केले जात आहेत. तालुकानिहाय मेळावे त्यांनी घेतले. मात्र दुसरीकडे पक्षातील गळती मात्र थांबण्याचे नाव घेत नाही आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता निश्चितच पक्षाला ही गळीत परवडणारी नाही. महापालिका निवडणुकीसह जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत पक्षाला मोठा फटका यातून बसू शकतो.
दुसरीकडे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांनाही भाजपने मोठा धक्का देण्याची तयारी केली आहे. जळगाव महापालिकेतील उद्दव ठाकरे यांच्या शिवसेनेतील दोन माजी महापौर यांच्यासह १३ माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे नितीन लड्डा यांच्या नेतृत्वात या १३ माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात शरद पवार यांच्यापाठोपाठ उद्धव ठाकरेंच्या पक्षाला मोठं खिंडार पडणार आहे.