
इलॉन मस्कची जगप्रसिद्ध कंपनी ‘टेस्ला’ आज भारतात धमाकेदार सुरुवात करण्यासाठी सज्ज झाली आहे. मंगळवारी (15 जुलै) मुंबईत या कंपनीच्या भारतातील पहिल्या शोरुमचं उद्घाटन होणार आहे.
मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) या पॉश परिसरात टेस्लाचा पहिला शोरुम सुरू होणार आहे. या शोरुमचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून होणार आहे. शोरुममध्ये टेस्लाचे एकापेक्षा एक दमदार मॉडेल्स उपलब्ध असतील. त्यात मॉडेल 3, मॉडेल Y आणि मॉडेल X ची यांचा समावेश असू शकतो. विशेष म्हणजे भारतातील टेस्लाच्या पहिल्या शोरुमची पाटी मराठीत आहे. मुंबईत सुरू झालेल्या या शोरुमची पाटी मराठी भाषेत आहे. टेस्लाकडून महाराष्ट्र सरकारच्या नियमांचं पालन करण्यात आलं आहे.
टेस्लाच्या कोणत्या गाड्या शोरुमध्ये दाखल होणार?
सध्या मॉडेल्सच्या नावांची अधिकृत घोषणा झाली नसली तरी ‘टेस्ला’ सर्वांत आधी त्यांच्या मॉडेल Y ला भारतात लाँच करणार असल्याचं म्हटलं जात आहे. याची आयात चीनमधून केली जाणार असल्याने भारतात त्यावर जवळपास 70 टक्के आयात शुल्क असेल. यामुळे भारतात कारची किंमत बरीच वाढू शकते. परंतु येत्या काळात ही कंपनी स्थानिक उत्पादनावरही विचार करू शकते, ज्यामुळे किंमतीत घट होऊ शकते. टेस्लाच्या आगमनाने भारतातील ऑटोमोबाइल मार्केटमध्ये तंत्रज्ञान आणि स्टाइल या दोन्ही गोष्टी एका नव्या पातळीवर पोहोचतील, असं तज्ज्ञांकडून म्हटलं जातंय.
शोरुमचं भाडं किती?
वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये टेस्ला कंपनीने 4000 स्क्वेअर फूटच्या रिटेल जागेला पाच वर्षांसाठी लीजवर घेतलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीला दर महिन्याला जवळपास 35.26 लाख रुपये भाडं द्यावं लागणार आहे. तर दर वर्षी शोरुमच्या भाड्यात 5 टक्क्यांची वाढ होणार असल्याचंही कळतंय. जे पाच वर्षांमध्ये 43 लाख प्रति महिन्यापर्यंत पोहोचू शकतं.
मिळालेल्या माहितीनुसार, मॉडेल Y आणि मॉडेल 3 या टेस्लाच्या दोन प्रसिद्ध मॉडेल्स या शोरुममध्ये दिसतील. मॉडेल Y ही देशात विकली जाणारी पहिली टेस्लाची कार असेल. याची आयात चीनमधून करण्यात आली आहे. हे दोन्ही मॉडेल्स लोकप्रिय आहेत. मॉडेल Y मध्ये Long Range RWD आणि Long Range AWD (Dual Motor) हे दोन प्रकार आहेत. रेंज आणि परफॉर्मन्स ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर ही कार जवळपास 574 किलोमीटरपर्यंत धावते. तसंच ती फक्त 4.6 सेकंदात 100 किमी प्रतितास वेग वाढवू शकते, ज्यामुळे ही कार अत्यंत चपळ इलेक्ट्रिक एसयूव्ही म्हणून ओळखली जाते.
या कारमध्ये एकापेक्षा एक दमदार फीचर्स आहेत. याला स्टँडर्ड प्लस आणि लाँग रेंजमध्येही लाँच केलं जाऊ शकतं. टेस्लाच्या मॉडेल 3 चा वेग ताशी 162 किलोमीटर आहे. या कारची खासियत म्हणजे ती फक्त 3 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रतितासाचा वेग वाढवू शकते. अमेरिकेत टेस्ला मॉडेल 3 ची किंमत 29,990 डॉलर (25.99 लाख रुपये) इतकी आहे. भारतात त्याची किंमत सुमारे 29.79 लाख रुपये असू शकते.