
कोल्हापुरात भाजपचा पहिला दणका; मुश्रीफांचा गडी फोडला…
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेनेने नुकताच भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला धक्का दिल्यानंतर आता भाजपने थेट राष्ट्रवादीचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनाच धक्का दिला आहे.
मंत्री मुश्रीफ यांचा विश्वासू गडी फोडून तब्बल 55 जणांचा पक्षप्रवेश कार्यक्रम आज पार पडला.
आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसचे माजी नगरसेवक दिलीप पोवार, सरस्वती पोवार, राष्ट्रवादी पक्षाचे माजी नगरसेवक उत्तम कोराणे यांच्यासह जवळपास 55 जणांनी मंगळवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबई येथे हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते. आगामी महापालिका निवडणूक महायुतीतर्फे लढविण्याच्या घोषणा महायुतीतील घटक पक्षाच्या नेत्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील अनेकजण महायुतीत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, भाजप आणि शिवसेनेकडून महायुतीतलेच पदाधिकारी गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवसेनेने अनेकांचे पक्ष प्रवेश केले त्यामध्ये भाजपमधील माजी नगरसेवकांचा समावेश होता. तो भाजपसाठी धक्का मानला जात होता. दरम्यान शिवसेनेच्या पाठोपाठ आता भारतीय जनता पक्षाने इतर पक्षातील माजी नगरसेवकांना सामावून घेण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी मुंबईत अनेक जणांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. यामध्ये काँग्रेससह राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा देखील समावेश आहे. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना देखील धक्का समजला जातो. मंत्री हसन मुश्रीफ यांचे समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. मात्र, भाजपाने कोराणे यांना आपल्या पक्षात सामावून घेतले आहे.