आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेना एकनाथ शिंदे यांनी दलित आणि मराठी मतांच्या गणिताची जुळवाजुळव केली आहे. शिवसेना आणि आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेची युती होणार असून हे दोन्ही पक्ष महापालिका आणि झेडपीच्या निवडणुका एकत्र लढणार आहेत.
बुधवारी दुपारी एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकर या युतीची घोषणा करणार असल्याची माहिती आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विचार करता शिवसेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे. एकनाथ शिंदे यांनी बेरजेचं गणित आखलं असून त्यांनी आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेला सोबत घेतलं आहे. त्या माध्यमातून मराठी आणि दलित मतदार सोबत घेण्याची खेळी शिंदेंनी खेळल्याची चर्चा आहे.
बुधवारी दुपारी 1 वाजता एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकर एकत्रित पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यावेळी शिंदेंची शिवसेना आणि आंबेडकरांची रिपब्लिकन सेना यांच्या युतीची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
महापालिका निवडणुकीची तयारी सुरू
येत्या नोव्हेंबर- डिसेंबरच्या दरम्यान महापालिका निवडणूक होणार या अंदाजाने सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. एकीकडे दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरु असताना महाविकास आघाडीचे काय होणार यावर मात्र कोणतीही चर्चा होत नाही. तर दुसरीकडे भाजपने महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली असून पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.
विधानसभेमध्ये नंबर एकचा पक्ष ठरलेला भाजप हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही एक नंबरवरच राहावा यासाठी नेते आग्रही आहेत. तसेच कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबई महापालिका ठाकरेंच्या हातून खेचून घेण्यासाठी भाजपने कंबर कसल्याचं दिसून येत आहे.
मनसे-ठाकरे युतीसंबंधी सस्पेन्स कायम
नाशिकमधील इगतपुरीत मनसेचं शिबीर सुरू आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, पालिका निवडणुका तसंच उद्धव ठाकरेंसोबतची युती या सर्व विषयांवर शिबिरात चर्चा करण्यात आली. मात्र आगामी निवडणुकीच्या कामासंदर्भात मार्गदर्शन करत राज ठाकरेंनी युतीबाबत भाष्य करणं मात्र टाळलं आहे.
मतदार याद्यांवर काम करा , युतीसंदर्भात योग्य वेळी निर्णय घेऊ असं आजही राज ठाकरे म्हणाले. एकीकडे ठाकरेंची शिवसेना युतीसाठी आशावादी असताना राज ठाकरेंच्या वेट अँड वॉचच्या भूमिकेमुळे युतीबाबत सस्पेन्स कायम आहे.
