दैनिक चालु वार्ता ठाणे-प्रतिनिधी-नागेश पवार
दिवा – दिवा परिसरात हातगाड्या व फेरीवाल्यांनी सार्वजनिक रस्ते आणि फुटपाथ अडवल्यामुळे नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. वाहतुकीला अडथळा, अपघाताचा धोका आणि नागरी असुविधा यामुळे स्थानिक जनता त्रस्त आहे.
कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनी याविरोधात वारंवार आवाज उठवला असूनही ठाणे महानगरपालिका व विशेषतः दिव्याचे सहाय्यक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे यांच्याकडून या प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे.
रोहिदास मुंडे यांनी याबाबत वारंवार महापालिकेला लेखी पत्रव्यवहार करूनही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. यामुळे संताप व्यक्त करताना रोहिदास मुंडे म्हणाले की,
“राज्याचे विधानसभेचे सभापती ॲड. राहुल नार्वेकर यांनी उपमुख्यमंत्र्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की, राज्यभरातील फुटपाथ मोकळे झाले पाहिजेत. मग दिव्यात मात्र प्रशासन गप्प का? सहाय्यक आयुक्त नागरगोजे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे, अन्यथा दिव्यात मोठा जनआंदोलन उभे करण्यात येईल.”
या संपूर्ण प्रकरणात प्रशासनाची उदासीनता आणि काही अधिकाऱ्यांची व स्थानिक लोकप्रतिनिधी आर्थिक हितसंबंध असल्याचे संशय मुंडे यांनी व्यक्त केला आहे .