
नंदुरबार जिल्ह्यात भाजपचे माजी मंत्री डॉ विजयकुमार गावित आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यात नेतृत्वाची स्पर्धा आहे. या संदर्भात आमदार रघुवंशी यांनी बुधवारी थेट देवेंद्र फडणवीस यांनाच साकडे घातले.
आमदार रघुवंशी यांची ही मागणी चर्चेचा विषय ठरली आहे.
नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री पद प्रदीर्घकाळ भाजपचे डॉ विजयकुमार गावित यांच्याकडे राहिले आहे. मात्र हा जिल्हा दरडोई उत्पन्नात राज्यात सर्वात शेवटी आहे. अशा विविध समस्यांची चर्चा आमदार रघुवंशी यांनी बुधवारी विधान परिषदेत राज्य शासनाच्या विकासाच्या प्रस्तावावर घडवली.
यानिमित्ताने शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नंदुरबारच्या विकासाच्या दृष्टीने एक नवे राजकीय पाऊल टाकले आहे. नंदुरबार जिल्ह्यातून दरवर्षी सात ते आठ लाख मजूर रोजगारासाठी गुजरात आणि अन्यत्र स्थलांतर करतात. या जिल्ह्यात रोजगाराचे आणि विकासाची गंभीर समस्या असल्याचे आमदार रघुवंशी यांनी सांगितले.
यापूर्वी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नंदुरबारचे पालकत्व स्वीकारले होते. कालावधीत नंदुरबारच्या अनेक प्रश्नांची सोडवणूक झाली. जिल्ह्यात विकासाची विविध कामे सुरू झाली. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात नव्या अपेक्षा निर्माण झाल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे गडचिरोलीचा विकास झपाट्याने होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नंदुरबार जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारावे. या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्याचा विकासाचा अनुशेष दूर होईल.
नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे पर्यटन स्थळ महाबळेश्वर एवढेच निसर्ग संपन्न आणि सुंदर आहे. शेजारच्या सापुतारा येथे काहीही विशेष नसताना गुजरात सरकारने आपली सर्व ताकद तेथे उभी केल्याने सापुतारा विकसित झाला. राज्य शासनाने तोरणमाळच्या विकासासाठी असाच पाठिंबा देण्याची मागणी देखील विधान परिषदेत आमदार रघुवंशी यांनी केली.
नंदुरबार जिल्ह्यात गेली पंधरा वर्षे भाजप नेते डॉ गावित नेतृत्व करीत आहे. पालकमंत्री पदासह जिल्ह्यातील सर्व संवैधानिक संस्थांवर त्यांचेच वर्चस्व राहिले आहे. स्थितीत आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि डॉ गावित यांच्यातील राजकीय स्पर्धा एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रघुवंशी यांनी थेट मुख्यमंत्र्यांना आवाहन केले आहे. त्यामुळे त्याला वेगळे राजकीय संदर्भ देखील आहेत.