
CM फडणवीसांचा एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न…
उद्धव ठाकरेंना सत्तेत येण्याची खुली ऑफर देत देवेंद्र फडणवीस यांनी आपला आणखी एक डाव टाकला. पण यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार का? या राजकीय चर्चेने जोर धरला. गल्लीतल्या पारापासून विधानसभेच्या बाकापर्यंत फडणवीसांनी दिलेल्या ऑफरची चर्चा सुरू आहे.
विशेष म्हणजे, देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना ऑफर दिली, त्यावेळी एकनाथ शिंदे उपस्थित होते अन् त्यांच्याकडेच अनेकांच्या नजरा खिळल्या. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या तोंडावरील भाव सभागृहातील आमदार अन् खासदारांनी टिपले. शिवसेना (ठाकरे) आणि भाजप यांची महाराष्ट्रातील सर्वात जुनी युती आहे. दोन दशकांपासून सोबत असणारे नेत राजकीय परिस्थितीमुळे दुरावले पण विचार आजही त्यांचे सारखेच असतील, यात दुमत नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या ऑफरचे वेगवेगळे अर्थ काढले जातील, यात शंकाच नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका ठाकरेंना ऑफर देत दुसर्या ठाकरेंना इशारा दिलाय? उद्धव ठाकरे यांना ऑफर देत फडणवीस यांनी शिंदे अन् अजित पवार यांना युतीत भाजपच मोठा असल्याचा सांगण्याचा प्रयत्न केलाय? फडणवीस यांची ऑफर ठाकरेंनी मनावर घेतली नसली, तर राजकारणात कधीच काही सरळ अन् साधं सोपं नसतं, एका वाक्याचे अनेक अर्थ निघू शकतात. फडणवीस यांनी ठाकरेंसाठी आपल्याकडील दारे खुली असल्याचे सांगत एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला. पाहूयात ठाकरेंना दिलेल्या ऑफरमळे काय काय होऊ शकतं. त्याआधी देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते एकदा पाहा…
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री२०२९ पर्यंत आम्हाला तिकडे (विरोधीपक्ष) यायचा स्कोप नाही, पण तुम्हाला (उद्धव ठाकरे) इकडे यायचा स्कोप आहे, त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू, ठाकरेंचा शिवसेना पक्ष आजही आमचा मित्रपक्ष आहे .